निकालाआधीच पराभव मान्य

congress
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागायला अजून एक आठवडा आहे पण त्याच्या आधीच महाराष्ट्रातल्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी पराभव मान्य केला आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना, लोकसभेत जे काही होईल ते होईल पण आता विधानसभेत तरी कामाला लागा असा सल्ला दिला आहे. कॉंग्रेसमध्ये तर आपला पराभव होणार असल्याने पराभवानंतर काय काय बदल करावेत यावर डाव आणि पेच आखले जायला लागले आहेत. कितीही सकारात्मक विचार केला तरीही कॉंग्रेसला आपले पूर्वीचे स्थान टिकवता येणार नाही हे या नेत्यांना माहीत आहे. २००९ साली कॉंग्रेसने १७ जागा जिंकल्या होत्या. तशा आता मिळणार नाहीत आणि या पराभवाचे किंवा पिछेहाटीचे अपश्रेय देऊन मुख्यमंत्र्यांची उचलबांगडी केली जाणार आहे. सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार हे नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कितीही दात खाऊन बोलत असले तरी ते ऐनवेळी टोपी फिरवून भाजपाप्रणित एनडीए आघाडीचा घटक होऊ शकतात. असे कॉंग्रेस नेत्यांना वाटते. त्यांचे हे गृहित चुकीचे नाही.

१९९९ साली पवारांनी सोनिया गांधींच्या परदेशी नागरिकत्वाच्या विरोधात मोठी मोहीम सुरू करून वेगळा पक्ष स्थापन केला. पण या वातावरणात झालेल्या निवडणुका पार पडताच त्यांना सोनिया गांधींच्या नेतृत्वाशिवाय आपल्याला सत्ता मिळणार नाही याचा साक्षात्कार झाला आणि ते कॉंग्रेस पक्षाच्या वळचणीला गेले. आता तसेच होईल असे मानून महाराष्ट्रातले कॉंग्रेसचे नेते आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याच्या विचाराला लागले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे भाजपमध्ये येण्याच्या मनःस्थितीत आले असल्याची अफवा पसरली आहे. तिला दुजोरा मिळालेला नाही. मात्र काही घटना मोठ्या सूचक वाटतात. नरेंद्र मोदी यांना जोपर्यंत न्यायालय दोषी ठरवत नाही तोपर्यंत दोषी म्हणू नये असे मत प्रफुल्ल पटेल यांनी मागे मांडले होते. ते या प्रसंगी हमखासपणे आठवते. या सगळ्या घटना कॉंग्रेसच्या नेत्यांना अस्वस्थ करत असणार हे उघड आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांची युती असली तरी शरद पवारांची चंचल मनोवृत्ती आणि कॉंग्रेसचे खच्चीकरण करण्यासाठी त्यांच्याकडून खेळले जाणारे डाव यामुळे फार पूर्वीपासून कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये स्वबळावर लढण्याची मागणी करणारा एक गट िनर्माण झाला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आधी पूर्व तयारीचा एक भाग म्हणून राहुल गांधी पुण्यात आले होते तेव्हा कॉंग्रेसच्या नेत्याच्या एका गटाने राष्ट्रवादीशी असलेली युती मोडावी असा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडला होता. त्याला उत्तर देताना राहुल गांधी यांनी सशर्त दुजोरा दिला होता. स्वबळावर लढायला माझी काही हरकत नाही. पण आपल्याला स्वबळावर लढल्यास विजय मिळणार आहे का याचा विचार करा असे ते म्हणाले होते. म्हणजे वेळ पडल्यास राष्ट्रवादीशी असलेली युती मोडण्यास राहुल गांधीसुध्दा तयार होते असे दिसते. असे झाल्यास महाराष्ट्रातल्या राजकारणाचे चित्र काय असेल? राष्ट्रवादीशी असलेली युती मोडून कॉंग्रेसने विधानसभा लढवली तर कॉंगे्रसची अवस्था मोठी बिकट होणार आहे. हे सांगण्यास ज्योतिषाचीही गरज नाही आणि कसल्या मतदार सर्वेक्षणाचीही आवश्यकता नाही. गेल्या काही निवडणुकातले निकाल या दृष्टीने बोलके आहेत आणि येत्या १६ मे रोजी लागणारे लोकसभा निवडणुकीचे निकाल त्यावर बराच मोठा प्रकाश टाकणार आहेत. शरद पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे आता म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत निष्प्रभ ठरत आहेत परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसची शक्ती अगदीच धुडकावून लावावे एवढी नक्कीच कमी नाही. ती शक्ती ज्याच्या पारड्यात जाऊन पडेल त्याच्या बाजूने विजयाचे पारडे झुकेल एवढी तरी त्यांची शक्ती नक्कीच आहे.

राजकारणात या शक्तीला उपद्रवमूल्य असे म्हणतात आणि ते कॉंग्रेसच्या विरोधात गेले तर कॉंग्रेसचे पारडे हलके होऊ शकेल. या सार्‍या गोष्टी गृहित धरून कॉंग्रेसमध्ये आता मुख्यमंत्र्यांचे काय करावे यावर विचारविनिमय सुरू झाला आहे. महाराष्ट्रातल्या पराभवाची जबाबदारी टाकून मुख्यमंत्र्यांना हलवावे आणि महाराष्ट्रात नेतृत्व बदल करून नव्या नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक लढवावी असा एक विचार प्रवाह कॉंग्रेस पक्षात वाहत आहे. परंतु कॉंग्रेस पक्षात नेतृत्वाची वानवा आहे. तसे मुख्यमंत्री होणे कोणालाही सोपे आहे परंतु अशा कठीण परिस्थितीत राज्यात कॉंग्रेसला नेतृत्व देऊन उलट्या प्रवाहात कॉंग्रेसची नाव यशस्वीपणे हाकेल असा एकही नेता पक्षात दिसत नाही. कॉंग्रेस मधला हा मोठाच पेच आहे. अर्थात, असा पेच निर्माण होेणे कॉंग्रेससाठी अपरिहार्य आहे. कारण या पक्षात गेल्या काही वर्षात नवे नेतृत्व पुढे येऊ दिले गेलेले नाही. केंद्रात बसलेल्या नेत्यांना राज्यातल्या नेत्यांचा नेहमीच धाक वाटत आला आहे. त्यामुळेच राज्याच्या स्तरावर समर्थ नेते निर्माण होणार नाहीत. याची दक्षता केंद्रातल्या नेत्यांनी घेतली आहे. प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या या धोरणामुळे कॉंग्रेस पक्षात ही मोठी पोकळी निर्माण झालेली आहे.

Leave a Comment