राहुल गांधीची अमेठी सीट धोक्यात- न्यूयॉर्क टाईम्स

rahul g
जगातील सर्वात मोठी लोकशाही निवडणुक म्हणून भारतातील निवडणुकांकडे पाहिले जात असताना अमेरिकी प्रसारमाध्यमांनीही या निवडणुकांकडे बारीक लक्ष ठेवले आहे. भारताच्या निवडणुकासंदर्भातली वेगवेगळी वार्तापत्रे प्रकाशित करण्यात न्यूयॉर्क टाईम्स या लोकप्रिय वृत्तपत्राने आघाडी घेतली आहे. याच वर्तमानपत्राने काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची अमेठीतील जागा धोक्यात असल्याचा अंदाज व्यक्त केला असून त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

गांधी नेहरू घराण्याची ही परंपरागत जागा आहे आणि राहुल गांधी २००४ पासून येथे खासदार आहेत. मात्र राहुल यांच्या वागणुकीने त्रस्त झालेल्या येथील नेत्यांनी यंदा राहुल यांना ही निवडणुक सोपी नसल्याचे संकेत दिले आहेत.१० वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करूनही येथील पाच कार्यकर्त्यांनी नांवे ते सांगू शकलेले नाहीत असे वृत्तपत्रात प्रसिद्ध केले गेले आहे. वास्तविक पाहता राजकारण हा या घराण्याचा कौटुंबिक व्यवसाय आहे व या घराण्याने देशाला तीन पंतप्रधान दिले आहेत मात्र राहुल यांना पंतप्रधान पद मिळण्याची शक्यता फारच कमी असल्याचेही यात नमूद केले गेले आहे.

मुंबईतील बुकींनीही राहुल यांच्या नावावर बेटिंग घेणे बंद केले असल्याचे वृत्तही दिले गेले असून गेली ६० वर्षे सत्तेवर असलेल्या काँग्रेसला प्रथमच मोठा पराभव स्वीकारावा लागण्याची शक्यता वर्तविली गेली आहे. राहुल गांधी अनेकदा अचानक गायब होतात, दाढी ठेवायची की काढायची हेही त्यांना ठरविता येत नाही अशी टीकाही या वर्तमानपत्राने केली असून राहुल व सोनिया यांनी प्रचाराच्या अखेरच्या भागात भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यास फार उशीरा सुरवात केली असल्याचेही म्हटले गेले आहे.

अर्थात भारतीय राजकारण प्रेडीक्ट करणे अवघड असल्याने अंतिम टप्प्यात कांहीही घडू शकते अशीही टिपण्णी यात करण्यात आली असून गांधी परिवाराला महिला व त्यातूनही ग्रामीण महिला मतदारांकडून जादा मते मिळतील असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.