मतदानाची शाई पुसली जात असल्याचे सिद्ध

voting
मतदान करण्यापूर्वी मतदाराच्या हाताला लावलेली शाई सहजी पुसली जात नाही व त्यामुळे मतदार दुसर्‍या ठिकाणी जाऊन बनावट मतदान करू शकत नाही असा सर्वसामान्य जनतेचा समज असेल तर तो पूर्ण चुकीचा असल्याचे नुकतेच सिद्ध झाले आहे. निवडणुक आयोगाच्या नियमांनुसार तयार करून घेतलेली ही शाई काडेपेटीतील काडीच्या गुलने सहज पुसता येते हे एका पत्रकाराच्या बोटावर केलेल्या प्रयोगातून सिद्ध झाले आहे.

निवडणुकांसाठी वापरली जाणारी ही शाई कर्नाटकातील म्हैसूर पेंट व वॉर्निश कंपनीकडून कित्येक वर्षे घेतली जाते. यात ७ ते २५ टक्के इतक्या प्रमाणात सिल्व्हर नायट्रेट वापरलेले असते व बोटाच्या नखांवर व त्याच्या मागील बाजूस ही शाई लावली की ती पुसली जात नाही. मात्र मुंबईत २४ एप्रिलला झालेल्या मतदानानंतर एका वर्तमानपत्राच्या पत्रकाराने बोटाला प्रथम पाणी लावून व नंतर त्यावर काडेपेटीच्या काडीतील गुल घासून ही शाई पुसता येते हे दाखविले. त्यासाठी पाच सहा काड्या लागल्या आणि चार ते पाच मिनिटांचा अवधी लागला असे समजते.

शरद पवार यांनी एका सभेत बोलताना सातार्‍यात १७ ला मतदान करा व पुन्हा मुंबईत २४ तारखेला मतदान करा असे विधान केले होते त्यावरून गदारोळही झाला होता. पवार यांनी आपण गमतीने बोलल्याचे स्पष्टीकरण दिले होते मात्र शाई पुसली जाते हे सिद्ध झाल्यानंतर शिवसेनेचे संजय राऊत यांनी पवार यांना ही गोष्ट नक्कीच माहिती असणार असा आरोप केला आहे. या प्रयेगाचे सार्वजनिक प्रदर्शन करण्याची मागणीही पुढे आली असून सुप्रीम कोर्टातील हरिश साळवे यांनी निवडणूक आयोगाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी असे मत व्यक्त केले आहे.

Leave a Comment