शब्दावाचून बोलणे

काही लोक शब्दाने बोलत नाहीत. कृतीने  बोलतात. नरसिंहराव शब्दाने बोलत नव्हते पण कार्याने बोलत होते.  त्यांनी मोजकेच बोलून भारताच्या अर्थव्यवस्थेला नवे वळण दिले. त्यांच्या न बोलण्यावर अनेक विनोद केले जात होते. पण अनेकांनी हे मान्य केले आहे की, भारतासारख्या खंडप्राय देशात फार बोलण्याने प्रश्‍न सुटण्याच्या ऐवजी अधिक गुंतागुंतीचे होत असतात. या गोष्टीचा अनुभव आपण आता घेत आहोत. मौन आणि कार्य याबाबत मनमोहनसिंग यांचा खाक्या मात्र वेगळा होता. ते कमी बोलतात त्यामुळे त्यांच्या विषयी अनेकांना आदर वाटत होता. किंबहुना कॉंग्रेसला २००९ सालची निवडणूक याच एका आधारावर जिंकता आली होती. पण २००९ सालनंतर असे लक्षात आले की मनमोहनसिंग यांच्या मौनामागे कार्याचे पाठबळ नाही तर एक प्रकारची हताशा आहे. त्यांच्या संबंधात प्रकाशित झालेल्या दोन पुस्तकांनी त्यांच्या या हताशेवर बराच प्रकाश टाकला आहे आणि सोनिया गांधी यांच्या हुकूमशाही प्रवृत्तीमुळे मनमोहनसिंग यांचे मौन अधिकच केविलवाणे झाले होते. सोनिया गांधी यांना राहुल गांधीला पंतप्रधान करायचे होते म्हणून त्यांनी मनमोहनसिंग यांची पुरती बेकिंमत केली होती. 

आता या गोष्टी ऐन निवडणुकीत प्रकाशात आल्या आहेत आणि त्यांच्यावर चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे कॉंग्रेस पक्ष अडचणीत आला आहे. त्यामुळे आता कॉंग्रेसचे नेते मनमोहनसिंग हे कसे उत्तम पंतप्रधान होते हे पटवून द्यायला लागले आहेत. त्यात काही लोक असे आहेत की ज्यांनी मनमोहनसिंग यांना पंतप्रधान असताना कधी मान दिलेला नाही. पण आता मात्र तेच कसे चांगले पंतप्रधान आहेत हे सांगण्याची त्यांच्यात अहमहमिका लागली आहे. गेल्या आठवड्यात प्रकाशित झालेल्या दोन पुस्तकांतून पंतप्रधानांची जी प्रतिमा तयार झाली आहे ती आपल्याला हानीकारक ठरणारी असल्याचे दिसायला लागल्यावर त्यांनी त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळायला सुरूवात केली आहे. याच कॉंग्रेस नेत्यांनी दोन वर्षांपूर्वी मनमोहन सिंग यांना राजीनामा द्यायला लावून राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्याची टूम काढली होती.  प्रियंका वड्रा यांनी तर मनमोहनसिंग हेच कसे सर्वात चांगले पंतप्रधान आहेत असे म्हटले आहे. त्यांच्या मानाने वाजपेयी हेच दुबळे पंतप्रधान होते असे प्रियंकाचे म्हणणे आहे. वाजपेयी यांच्या दुबळे पणाचा एकमेव पुरावा म्हणजे त्यांनी मोदींना राजीनामा द्यायला सांगितले असूनही मोदींनी राजीनामा दिला नाही. या प्रकरणाचा बराच तपास करावा लागेल. 

वादासाठी हे खरे आहे असे गृहित धरले तरी एवढया एका गोष्टीवरून वाजपेयी सर्वात दुबळे कसे ठरतात आणि मौनमोहनसिंग त्यांच्यापेक्षा प्रभावी कसे ठरतात हे काही कळत नाही. मनमोहनसिंग हे तर कोणालाच काही सांगत नव्हते आणि  त्यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री त्यांना काही सांगत नव्हते.  त्यामुळे त्यांचे कोणी ऐकण्याचा किंवा न ऐकण्याचा काही प्रश्‍नच नव्हता. कॉंग्रेसचे नेते त्यांच्या मोठेपणाचा आणि प्रभावाचा आणखी एक पुरावा देतात तो म्हणजे त्यांनी दहा हजार भाषणे केली आहेत. आता ही भाषणे कधी आणि  कोठे केली हा एक संंशोधनाचाच विषय आहे. मात्र ते मानले तरीही त्या भाषणांनी काय झाले याचा काही पत्ता लागत नाही. एखादा माणूस किती भाषणे करतो यावरून त्याचे मोठेपण आणि प्रभाव मोजायचा नसतो तर त्या भाषणाने काही परिवर्तन झाले आहे की नाही यावरून तो मोजायचा असतो. पी. व्ही. नरसिंहराव हेही कमी बोलत असत. पण राव आणि सिंग यांच्या कमी बोलण्यात फरक होता. नरसिंहराव यांच्या मौनामागे चिंतनही होते आणि चांगले काम करण्याची मोठी योजना होती. नेमकेपणाने सांगायचे तर नरसिंहराव मौनी नव्हते. ते मोजके आणि निर्णायक बोलत असत. त्यांनी मोजकेच बोलून दोन चांगली कामे केली. 

त्यांनी १९९१ ते १९९५ या काळात सोनिया गांधी यांचा राजकारण प्रवेश अडवून धरला. सोनिया गांधी राजकारणात यायला काही धडपड करायला लागल्या की नरसिंहराव यांच्या पंतप्रधान कार्यालयातून बोफोर्सविषयीचा  एखादा महत्त्वाचा कागद माध्यमांकडे दिला जायचा. त्याची चर्चा व्हायला लागली की सोनिया गांधी यांचे पाऊल मागे पडायचे. दुसरे म्हणजे नरसिंहराव यांनी धाडसाने मुक्त अर्थव्यवस्था राबवली. ती त्यांनी मनमोहनसिंग यांच्या कडून राबवली पण तिला ही दिशा देण्याचे नियोजन पूर्णपणे रावांचे होते. नरसिंहराव यांनी भारताच्या अर्थकारणाला पुढची ५० वर्षांसाठी दिशा दिली. त्यांच्यात एक तत्त्वज्ञ दडलेला होता. मनमोहनसिंग यांचे तसे नाही. ते अर्थशास्त्रज्ञ आहेत असे म्हटले जाते पण त्याविषयीही आता शंका यायला लागल्या आहेत. त्यांच्या समर्थकांनी अनेकदा ते जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ आहेत असा गवगवा केला आहे पण याचा नेमका अर्थ काही कळत नाही. त्यांचे ते शास्त्र भारतात ते पंतप्रधान असताना कधी काम करताना दिसले नाही. त्यांनीच अर्थमंत्री असताना अर्थकारणात केलेल्या बदलाचे लोण पुढे नेण्याचे काम त्यांंना पंतप्रधान म्हणून करता आले नाही. त्यांच्यासारखा कथित अर्थशास्त्रज्ञ  अर्थमंत्री म्हणून खपून जाताे. क्वचित चांगले कामही करू ेशकतो पण अशा माणसाला पंतप्रधान म्हणून काम करण्यासाठी दूरपल्ल्याचे नियोजन करण्याचा वैचारिक दृष्टीकोन असावा लागतो. तो त्यांच्याकडे नाही.

Leave a Comment