मोदींना पाठिंबा विनाशर्त -राज ठाकरे

मुंबई – नरेंद्र मोदींना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दिला गेलेला पाठिंबा हा विनाशर्त असून आम्हाला त्यांच्याकडून कोणत्याही फायद्याची अपेक्षा नाही. आम्हाला कॅबिनेट मंत्रीपदे मिळावीत अशीही अपेक्षा नाही असा खुलासा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी झी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

राज म्हणाले की आमचा पाठिबा मोदी या व्यक्तीला आहे. मी सरळ बॅटने खेळतो आहे, यात राजकारणाचा संबंध नाही. भावी पंतप्रधान म्हणून मोदी बेस्ट व्यक्ती आहेत कारण त्यांना व्यवसाय, विकास याची जाण आहे आणि सर्वसामान्य लोकांशी त्यांचा उत्तम संवाद आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. गुजराथची प्रगती मी स्वत; पाहिली आहे. सध्यातरी देशात मोदींना पर्याय नाही.

महाराष्ट्रातच मनसेचे अस्तित्व पुसट असताना देश पातळीवर ते किती असेल असे विचारता राज ठाकरे यांनी पक्षबांधणीसाठी वेळ जावाच लागतो असे सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांचा प्रभाव आपल्यावर खूप असून त्यांच्याप्रमाणे आपली प्रतिमा बनविण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. देशात मोदी लहर असली तरी प्रादेशिक पक्षांना कमी समजू नका असाही इशारा त्यांनी यावेळी दिला.

Leave a Comment