पवारांचे तळ्यात मळ्यात

शरद पवार यांनी काल दिलेल्या एका मुलाखतीत आपण निवडणुकीनंतर तिसर्‍या आघाडीच्या वळचणीलाही जाऊ शकतो हे स्पष्ट सांगितले आहे. त्यांच्या सतत बदलत चाललेल्या मन:स्थितीचे हे द्योतक आहे. याच मनस्थितीत त्यांनी मुंबईतल्या राहुल गांधी यांच्या सभेला दांडी मारली.  

वास्तविक ही सभा सोनिया गांधी यांची होती पण  प्रकृती चांगली नसल्याने ती झालीच नाही. त्यांच्या ऐवजी राहुल गांधी यांनी या सभेला संबोधित केले. मुंबईतले कॉंग्रेसचे उमेदवार त्यांच्या सभेकडे डोळे लावून बसले होते पण यंदाच्या निवडणुकीत सोनिया गांधी या आजारामुळे प्रचारात फार  हिरीरीने उतरलेल्याही नाहीत. त्यांच्या भाषणात काही मुद्दे नसतात. गेल्या १५ वर्षांपासून त्यांच्या भाषणातल्या वाक्यांतही फारसा फरक पडलेला नाही. भारतीय जनता पार्टी हा पक्ष समाजात फूट पाडणारा पक्ष आहे आणि आपला कॉंग्रेस पक्ष सेक्युलर आहे यापलीकडे त्यांना काही येतही नाही. तळमळीतून भाषण प्रभावी होणे हा प्रकारच नाही. कॉंग्रेस पक्षाविषयी जनतेत असलेले आकर्षणही लोप पावत चालले आहे.  सुरूवातीचा काही काळ सोनिया गांधी यांना बघायला लोक येत असत पण त्यांना देशाने  एकदा पाहून घेतले असल्याने त्यांना पाहण्याविषयी असलेले आकर्षणही कमी झाले आहे.

सगळीकडूनच गोची झालेले कॉंग्रेसचे नेते आता सोनिया गांधी यांच्या सभेकडे डोळे लावून बसले होते. कारण याही अवस्थेत राहुल गांधी यांच्यापेक्षा सोनिया गांधी यांची सभा बरी अशी कॉंग्रेसच्या नेत्यांची भावना आहे. तामिळनाडूत  तर अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या मतदारसंघात राहुल गांधी यांची सभा ठेवू नये अशी मागणीच केली होती. ते लातूरच्या सभेत टॉफीच्या गोष्टी बोलतात पण या ग्रामीण भागातल्या लोकांना टॉफी म्हणजे काय हे माहीत नाही याची त्यांना काही कल्पना नाही. त्यांच्या बोलण्याची आणि भाषणांची चेष्टा होत असते. त्यामुळे राहुल गांधी यांची सभा होणार म्हटले की कॉंग्रेसच्या उमेदवारांच्या पोटात गोळा उठतो.  मात्र काल मुंबईतल्या उमेदवारांना राहुल गांधी यांच्या सभेवर भागवून घ्यावे लागले. सोनिया गांधी धुळे, नंदूरबार आणि मुंबई अशा तीन सभा घेणार होत्या पण त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला. अर्थात काय बिघाड झाला याचे तपशील कॉंग्रेस पक्षाने जाहीर केले नाहीत. राहुल गांधी यांच्या सोबत शरद पवार सभेत बोलतील असेही पक्षातर्फे सांगण्यात आले होते. पण ज्या क्षणाला ही घोषणा झाली त्या क्षणापासून पवार नक्की येतील का अशी चौकशी सुरू झाली होती. शरद पवारांना राहुल गांधी यांचे नेतृत्व मान्य नाही म्हणून अशा शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या.

अपेक्षेप्रमाणे पवार या सभेला आलेच नाहीत. त्यांच्या येण्याबाबतचे लोकांचे अंदाज खरे ठरले. ठरल्याप्रमाणे त्यांचे  हेलिकॉप्टर बिघडले. त्यांनी आपल्या ऐवजी जयंत पाटील यांना पाठवले. अर्थात पवारांच्या अनुपस्थिती मागच्या या कारणावर लोकांचा विश्‍वास नाही. पवार या सभेला यायला निघाले होते पण काय करणार, अचानक हेलिकॉप्टर बिघडले. मग एकदम पवारांना जयंत पाटलांची आठवण झाली. त्यांनी पाटलांना पाठवले. ज्या क्षणाला त्यांनी जयंत पाटलांना पाठवण्याचा निर्णय घेतला आणि ज्या वाहनाने पाटील  वेळेवर सभेला येऊन पोचले त्याच क्षणाला त्याच वाहनातून पवार स्वत: येऊ शकले असते. पण त्यांनी बहाणा केला. लोक बोळ्याने दूध पितात असा त्यांचा समज आहे. या मागे अजून एक कारण असते. सोनिया गांधी आणि राहुल गांधी ज्या सभांत भाषणे करतात त्या सभांत ते अन्य कोणा ेनेत्याला चमकू देत नाहंीत. ही त्यांची परंपरा आहे. गांधी घराण्यापेक्षा कोणी मोठा होता कामा नये हा त्यामागचा हेतू आहे. लोक जमतात ते गांधी घराण्याच्या वलयामुळे जमतात  मग त्यांच्या पुण्याईने आलेल्या सभेतला श्रोता त्यांनी दुसर्‍या कोणाला का मिळवून द्यावा ? एवढे असूनही कॉंग्रेसचे काम टीमचे काम आहे असा त्यांचा दावा आहेच. असे असले तरीही मुंबईतली स्थिती अशी आहे की, त्यांना राहुल गांधी यांच्या सोबत पवार चालले असते. 

त्यांना पवार चालले असते पण पवारांना राहुल गांधी चालत नाहीत. पवार राहुल गांधी यांना आपल्यापेक्षा कनिष्ठ समजतात. या दोघांचे जमतही नाही. मागे एकदा या दोघांत सवाल जबाब झालेले आहेत. तेव्हा पवार त्यांच्या व्यासपीठावर गेले असते आणि त्यांना दुय्यम वागणूक मिळाली असती तर त्यांना ती चालली नसती. पवारांनी स्वत: या सभेत सहभागी होणे योग्य मानले नाही पण आपल्या पक्षातला तुलनेने कमी महत्त्व असलेला नेता या सभेला पाठवला. यावरून ते राहुल गांधी यांना काय आणि किती मानतात यावर प्रकाश पडतो. पवारांच्या या अनुपस्थितीचे अनेक परिणाम होणार आहेत. कारण मुंबईत पवारांना मानणार्‍या मतदारांना या अनुपस्थितीतून एक वेगळाच संदेश मिळाला आहे. खरे म्हणजे पवारांचे हे वागणे आघाडीच्या धर्माला सोडून आहे. त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी रत्नागिरीत आघाडीचा धर्म सोडून निलेश राणे यांचा प्रचार करण्यास नकार दिला तेव्हा पवार स्वत: त्या प्रचाराला गेले, आघाडीचा धर्म न मानणार्‍यांवर त्यांनी कारवाई केली. त्यांना अवदसा आठवली असल्याची टीका केली. पण आता राहुल गांधी यांच्या सभेला दांडी मारून त्यांनी कोणत्या आघाडीचा धर्म पाळला आहे हे त्यांंनाच माहीत.

 

Leave a Comment