सहारा कडून अमूलला मानहानीची नोटीस

सध्या अडचणीत असलेल्या सहारा समुहावर बेसहारा परिवार अशा शीर्षकाने जाहिरात करणार्‍या अमूल बटरच्या या जाहिरातीची सहारा समुहाने गंभीर दखल घेतली असून मानहानी केल्याप्रकरणी अमूलला कायदेशीर नोटीस बजावली आहे.

गुंतवणुकदारांचे पैसे परत करण्यात अपयशी ठरल्याबद्दल सहाराचे संस्थापक सुब्रतो रॉय सध्या तुरूंगाची हवा खात आहेत. गुजराथ दूध संघाच्या अमूल बटर या उत्पादनासाठी बेसहारा परिवार या शीर्षकाखाली जाहिरात करण्यात आली होती त्यासंदर्भात पाठविलेली नोटीस मिळाली असल्याने दूध संघाचे प्रमुख आर.एस. सोधी यांनी सांगितले. ते म्हणाले की अमूल बटरच्या जाहिराती नेहमीच चर्चित विषयांना अनुसरून कार्टून स्वरूपात केल्या जातात. त्यानुसार ही जाहीरात केली गेली होती.

१९९० साली याच प्रकारे बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनीही अमूलला अशाच प्रकारे मानहानी केल्याप्रकरणी कायदेशीर नोटीस पाठविली होती. जवळजवळ २५ वर्षांनंतर पुन्हा एकदा मानहानी केल्याप्रकरणी अमूलची पांढर्‍या फ्रॉकमधील बेबी अडचणीत आली आहे.