लोकसभा प्रचाराची रणधुमाळी देशभर सुरू आहे आणि या प्रचारात महत्त्वाच्या नेत्यांची ने आण करण्यात गुंतलेल्या देशभरातील सुमारे १३० चार्टर विमान ऑपरेटर व्यवसाय वाढीचा आनंद लुटताना दिसून येत आहेत. कारण या काळात या ऑपरेटर लोकांचा व्यवसाय तब्बल ४०० कोटींवर गेला असल्याचे समजते.
बहुतेक सर्व राजकीय पक्ष हवाई सेवेचा लाभ घेत आहेतच पण त्यातही बडे राजकीय पक्ष दररोज किमान ३० ते ४० हेलिकॉप्टर आणि ६ छोट्या विमानांचा वापर करत आहेत. १ इंजिन वाल्या हेलिकॉप्टचे भाडे तासाला ७० ते ७५ हजार तर बिझिनेस जेट विमानाचे भाडे तासाला ३ लाख रूपये आहे. यंदाच्या निवडणुकीत या ऑपरेटरच्या व्यवसायात ४० टक्के वाढ झाली आहे.
ही सेवा पुरवणार्या ऑपरेटर पैकी एक शुभा अॅव्हीएशनचे गौतम सहानी म्हणाले की लोकसभा निवडणुकांमुळे आमच्या व्यवसायाला चांगलीच चालना मिळाली आहे. त्याचबरोबर एअरक्राफ्ट मेटेंनन्स सेवा कंपन्यांनीही चांगला व्यवसाय केला आहे.