पवार पुराण…..उवाच

या निवडणुकीच्या धामधुमीत शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे असे तीन पवार फारच आक्रमक झालेले दिसत आहेत. अगदी महाराष्ट्रातील निव़डणुकीचा शेवटचा टप्पा सुरू असून त्यातही हा आक्रमकपणा कमी झालेला नाही. खरतर हा आक्रमकपणा नसून याला मराठीत एक सुंदर शब्द आहे त्रागा, पवारांचा त्रागा सध्या सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवलेली नाही त्यांनी आपल्याबद्दल बोलू नये आपण 14 वेळा निवडणूक लढवली आणि जिंकली आहे अशी टिप्पणी शरद पवार यांनी केली. शरदबाबूंना याची आठवण करून द्यावी लागते की कोणत्याच ठाकरेंनी निवडणूक लढवलेली नाही. कारण त्यांना सत्ता आपल्या हातात घ्यायची नव्हती. सत्तेची लालसा त्यांना नव्हती असे म्हटले तरी पवारांना परत राग येईल. मग पवारांनी 14 वेळी निवडणूका जिंकून काय केले ? अगदी त्यांना प्रत्येकवेळी निवडून देणा-या बारामती तालुक्यात या निवडणुकीतही पाणी तोडण्याची धमकी द्यावी लागते यावरूनच पवारांबद्दलचे जनमत काय आहे याचा अंदाज येतो.

हातच्या कंकणाला आरशीची गरज नसते तसेच येथे आहे. पवार यांनी मत घेतली पण बारामतीकरांचा दुष्काळ गेल्या 42 वर्षात त्यांना हटवता आलेला नाही ही वस्तूस्थिती आहे. आजही सर्वात अगोदर पाण्याचे टँकर बारामतीत सुरू होतात अन ते अर्धा पावसाळा गेला तरी सुरूच असतात हे खरं की खोट पवारांनीच सांगावे. एकेकाळी याच शरद पवारांवर बारामतीकरांनी प्रेम केले, त्यांना भरघोस मत दिली. पण त्याचे काय फळ मिळाले त्यांना ? उलट काकांना निवडून देण्याचे फळ म्हणजे त्यांचा टग्या म्हणवून घेणा-या पुतण्याची दादागिरी त्यांच्या नशिबी आली. अजित पवारानी मत न दिल्यास पाणी तोडण्याची धमकी दिली. ही गोष्ट खोटी नक्कीच नाही कारण तिथे पत्रकारही होते. त्यांनी स्वताच्य कानांनी हे ऐकले आहे. कदाचित शब्द वेगळे असतील पण मतीतार्थ तोच होता. त्याविरूद्ध जानकर आणि सुरेश खोपडे यांनी तक्रारी केल्या. पण त्यावर ग्रामीण पोलिसांनी अजित पवाराना क्लीन चिट दिली आणि ते दोषी नाही असा अहवालही लगेच तयार झाला. या उलट जानकर प्रचारात सुप्रिया सुळेंविरूद्ध बोलले तर त्यावर आगपाखड सुरू केली या पवारांनी. त्यामुळे लगेचच त्यांच्या पक्षाचा तेथील पदाधिका-याने तक्रार केली.

पोलिसांनी व्हीडीओ बघून शहानिशा केली आणि जानकर यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला. याच जानकरांच्या तक्रारीवर अजित पवार निर्दोष तर राष्ट्रवादीच्या तक्रारीवर जानकर दोषी ठरतात. याचा दुसरा अर्थ असा की , यावेळी पवार हे फक्त कार्यकर्त्यांच्या मदतीवर अवलंबून नाहीत तर पोलिसही राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते झाले आहेत. त्यामुळे पक्षाच्या नेत्याच्या विऱोधात ते कसे गुन्हा नोंदवतील, शक्यच नाही. यांच्या तोंडात भाषा जर विकास कामांची असेल तर मग अशी दादागिरीचे शब्द त्यांच्या तोंडी कोण घालतात याचाही शोध पोलिसांनी घेतला पाहिजे. पवार हे सत्तेशिवाय राहूच शकत नाहीत. जनता राजवटीत याच शरद पवारांनी 1978 साली काँग्रेसच्या पाठीत खंजीर खूपसून पुलोदचे सरकार स्थापन केले आणि या सरकारचे ते प्रमुख झाले. त्यानंतर तीन वेळा ते मुख्यमंत्री झाले पण मराठा असूनही एकदाही त्यांना पाच वर्षाचा कार्यकाल पूर्ण करता आलेला नाही. प्रत्येकवेळी पक्षाच्या हायकमांडने त्यांना अडीचतीन वर्षातच त्यांच्याकडून सत्ता काढून दुस-याकडे दिली आहे हा इतिहास आहे. तो पवारही बदलू शकत नाही. या उटल महाराष्ट्रात पहिल्यांदाच सत्ता आलेल्या शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी, ब्राम्हण असूनही त्यांना चारवर्षे मुख्यमंत्री पदी बाळासाहेब ठाकरे यांनीच बसवले होते. जर ठाकरे इतकं करू शकतात तर ते स्वता कशाला निवडणूक लढवतील, त्यांनी अनेकांना शब्दावर निवडून आणले, सत्तेत पद दिली. याच ठाकरेंनी पद दिलेले छगन भुजबळ हे मोठे असल्याची जाणिव ठाकरेमुळेच पवारांना झाली आणि त्यांनी भुजबळांना गद्दारी करायला लावली हाही इतिहास आहे.

ठाकरेंनी स्वतासाठी कधीच मत मागितली नाहीत म्हणून त्यांनी ज्यांच्यासाठी मत मागितली ती मतदारांनी दिली. या उलट पवारांनी पुलोदमध्ये जनसंघाचाही पाठिंबा सत्तेसाठी घेतलाच होता. जे नरेंद्र मोदी हे हिटलर असल्याचे पवारांना वाटते ते मोदीही जनसंघाचेच होते. काँग्रेस सोडल्यावर पुन्हा एकदा पवारा राजीव गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसवासी झाले. त्यानंतर त्याना केंद्रात मंत्रीपद आणि बॉम्बस्फोटामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद मिळाले. पण या मुख्यमंत्रीपदानंतर राज्यातील मतदारांनी पवारांना सत्तेवरून खाली ओढले आणि सेनाभाजपच्या हातात सत्ता सोपवली. शरद पवार, अजित पवार यांना कधी मतदारांनी राजीखूषीने निवडून दिले आहे हे कोणीही सांगावे. आता सुप्रियाची तिच गत चालली आहे. सुरूवातीपासून स्वताच्या कुटुंबाला प्रचारापासून दूर ठेवलेल्या सुप्रियाताईंना नवरा व मुलांना सोबत घेऊन प्रचारात का उतरावे लागले ? मोठ्या पवारांनी कार्यकर्ते जमवले, स्वताचे समर्थक तयार केले. मग ते कोणत्याही पद्धतीने असो पण केले. छोट्या पवारांनी गुंडपुंड जमा करत स्वताचे समर्थक तयार केले आणि सुप्रिया या दोघांच्या समर्थकांच्या जीवावर राजकारण करत आहेत. गेल्या पाच वर्षात सुप्रिया सुळे यांचे समर्थक असे एकदाही दिसले नाहीत. एकंदरीत या तिन्ही पवारांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेतला असता सत्ता आपल्या हाती ठेवण्यासाठी वेळोवेळी या दोन्ही पवारांनी हिटलरचा रोल केलेला आहे. त्यामुळे खरी हिटरल प्रवृत्ती कोणात दिसते पवारांच्यात की…….

!! इति श्री रेवा खंडे पवार पुराण समाप्त !!!

Leave a Comment