मनोहर जोशी बोलले

बर्‍याच दिवसांपासून मनोहर जोशी बोललेच नव्हते. तसे त्यांनी बोलण्याचे काही कारणही नव्हते पण बर्‍याच दिवसांच्या मौनानंतर ते बोलले आणि अप्रस्तुत बोलले. ते असे काही बोलले की त्यांनी बोलण्याच्या ऐवजी मौन पाळले असते तर बरे झाले असते असे वाटले. कोणताही नेता प्रसिध्दीला हपापलेलाच असतो. आपला प्रसिध्दीचा हव्यास अशोभनीय आहे हे त्यांना कळतही असते परंतु प्रसिध्दीची नशा दारूच्या नशेपेक्षाही वाईट असल्यामुळे त्यांना या प्रदर्शनापासून स्वतःला वाचवता येत नाही. मनोहर जोशी यांनी पुन्हा एकदा प्रसिध्दीच्या झोतात येण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी त्यासाठी उपस्थित केलेला विषय तकलादू आणि हास्यास्पद आहे. तो ऐकल्यानंतर खरेच हसावे की रडावे हे कळत नाही. त्यांना बोलतं करण्यार्‍यांनी शेवटी त्यांची मुलाखत का घेतली हेही कळत नाही. राजकारणाच्या अशा अवस्थेत किंवा कोणत्याही क्षणी अशा व्यक्तीची मुलाखत घेतली जाते की ज्याचे राजकारणातले स्थान निर्णायक आणि महत्त्वाचे असते. मनोहर जोशी यांचे आजच्या निवडणुकीच्या मोहिमेतले स्थान कोणते? ते काही प्रचारप्रमुख नाहीत, एखाद्या मतदारसंघातले उमेदवारही नाहीत, शिवसेनेचे पदाधिकारीही नाहीत. 

एकेकाळी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि ते नंतर काही काळ लोकसभेचे सभापती झाले. या गोष्टींचा आता त्यांच्यासह सर्वांना विसर पडलेला आहे. त्यांची तेव्हाची ती पदे ही आजच्या राजकारणावर दूरान्वयानेही प्रभाव टाकणारी नाहीत. एकवेळ त्यांनी मुख्यमंत्री असताना घेतलेल्या काही निर्णयावर ते बोलले असते तर त्यांचे ते निवेदन थोडेतरी प्रभावी ठरले असते. परंतु तसेही काही झालेले नाही. २००९ साली म्हणजे ५ वर्षापूर्वी बाळासाहेब ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांनी मनोहर जोशी यांना शरद पवार यांच्याकडे युतीची बोलणी करण्यासाठी पाठवले होते.  असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. आता २००९ साली घडलेल्या एका घटनेचा असा गौप्यस्फोट करून राजकारणात असे काय घडणार होते की त्यामुळे वृत्तपत्रांनीही त्यांच्या या निवेदनाला एवढे महत्त्व द्यावे? मुळात ही गोष्ट पाच वर्षांपूर्वी घडलेली. तीसुध्दा घडलेली म्हणजे जोशींना पवारांकडे पाठवले एवढेच घडलेले. ठाकरे पितापुत्रांनी पवारांशी युती व्हावी म्हणून त्यांना पाठवले असेल तर जोशी ते काम पूर्ण आणि यशस्वी करून आलेलेही नाहीत. असे जर आहे तर या गोष्टीचा पाच वर्षांनंतर स्फोट करण्याचे कारण काय? या कथित गौप्यस्फोटातली एक गोष्ट पूर्णपणे हास्यास्पद आहे. 

शरद पवार महाराष्ट्रात शिवसेनेशी युती करण्याच्या तयारीत होते. हा मुळात गौप्यस्फोट होऊच शकत नाही. कारण पवार नेहमीच कोणाशी तरी युती करण्याच्या नेहमीच मनःस्थितीत असतात. त्यांची मनःस्थिती खरोखर तशी असते की ते तशी हवा निर्माण करत असतात हे केवळ पवारांनाच माहीत. परंतु पवार कुणाशी तरी हातमिळवणी करण्याचा विचार करतात यामध्येे नाविन्य काहीच नाही आणि ही गोष्ट पाच वर्षांनी जाहीर करण्याचा प्रकार म्हणजे शिळ्या कढीला ऊत आणणे आहे.  त्यावेळी ठाकरे पितापुत्रांनी जोशी यांना त्यांच्याकडे पाठवले होते या घटनेला आजच्या राजकारणात तरी कसलाही अर्थ नाही. मग मनोहर जोशी यांनी आजच्या घडीला या शिळ्या कढीला ऊत का आणला आहे असा प्रश्‍न उरतो. हा ऊत आणण्याचे एकमेव कारण म्हणजे मनोहर जोशी यांना उपेक्षेचे चटके जाणवायला लागले आहेत. शिवसेनेमध्ये ते आता अडगळीला पडले आहेत. आपल्याला अडगळीला टाकल्यामुळे शिवसेनेची भलतीच पंचाईत होईल अशा भ्रमात ते होते. पण ते अडगळीला पडले असूनही शिवसेना व्यवस्थित चालली आहे.  शिवसेनेत काही प्रश्‍न निर्माण झाले आहेत हे खरे. परंतु मनोहर जोशी सक्रिय असते तर हे प्रश्‍न निर्माण झाले नसते असेही काही नाही आणि ते त्यांनी सोडवले असते असेही काही नाही. मात्र राजकारणी लोकांचा एक रोग आहे. त्याला जोशीही अपवाद नाहीत. 

ज्यांना नगरसेवका पासून लोकसभेच्या सभापतीपदापर्यंत सातत्याने पदावर राहण्याची सवय जडली आहे. त्यांना पदापासून फार दूर राहणे सहन होत नाही. भल्याबुर्‍या मार्गांनी का होईना पण ते सतत प्रसिध्दीच्या झोतात येण्याचा सतत प्रयत्न करत राहतात. उपेक्षेच्या गर्तेत गेलेला असा नेता जेव्हा आपल्या अवस्थेवर मात करण्यासाठी येनकेन प्रकारेण प्रसिध्दीच्या मागे लागतो तेव्हा तो केविलवाणा दिसायला लागतो. मनोहर जोशी यांचा प्रकार असाच झालेला आहे. ज्या फटाक्यावर  पाणी पडून तो फुसका झाला आहे त्याचा बार काढण्याचा प्रयत्न करून ते अशीच केविलवाणी धडपड करताना दिसत आहेत. त्यांनी आपल्या मुलाखतीत शिवसेनेतल्या अन्यही प्रश्‍नांची चर्चा केली आहे खरी पण त्या प्रश्‍नांशी त्यांचा काहीही संबंध नाही. त्यांनी त्यांची चर्चा करण्याचे कसले औचित्यही नाही. मात्र मनोहर जोशी यांना आपले राजकारण संपले आहे हे मान्यच होत नाही. आपण कधी ना कधी तरी उपराष्ट्रपती किंवा राष्ट्रपती होऊ अशी स्वप्ने त्यांना पडत आहेत आणि त्यातून हे प्रकार घडत आहेत.

Leave a Comment