सोनिया – मोदींच्या रॅलींवर मुंबईकरांची नजर

मुंबई- मुंबईत होत असलेल्या २४ एप्रिलच्या मतदानाअगोदर २० एप्रिलला होत असलेली काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्या पाठोपाठ २१ एप्रिलला होत असलेली भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची सभा हे मुंबईकरांसोबतच महाराष्ट्रासाठीही मोठे आकर्षण ठरले असल्याचे अनुभवास येत आहे. या दोन्ही सभा बांद्रा कुर्ला संकुलात होत आहेत.

यापूर्वी डिसेंबरमध्ये याच मैदानावर मोदींनी पहिली प्रचार सभा घेतली होती त्यावेळी अलोट गर्दी जमली होती. त्या गर्दीचा विक्रम मोडण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली असून सोनियांच्या सभेला किमान २ लाख प्रेक्षक उपस्थित राहतील यासाठी प्रयत्न केले जात आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते जनार्दन चांदूरकर यांनी सोनियांच्या सभेला होणारी गर्दी पाहून भाजप मोदींची सभा रद्दच करेल असा विश्वास व्यक्त केला आहे तर दुसरीकडे भाजपचे महासचिव अमरजित मिश्र यांनी मोदींच्या पहिल्या सभेचे रेकॉर्ड काँग्रेसने अगोदर मोडून दाखवावे आणि मग पुढच्या गोष्टी कराव्यात असा टोला चांदूरकर यांना लावला आहे.