इशा अंबानी करतेय मॅकेंझीत नोकरी

मुंबई- जगातील मोठ्या उद्योगपतीत गणना होत असलेले रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची कन्या इशा अमेरिकी मॅनेजमेंट कन्सल्टन्सी मॅकेंझी येथे नोकरी करत असल्याचे वृत्त आहे. रिलायन्सने या संदर्भात कांहीही बोलण्यास नकार दिला असला तरी इशाची नोकरी रिलायन्समध्ये तिचे स्थान वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

२२ वर्षीय इशा हिला व्यवसायात रस आहे आणि सध्या ती रिलायन्सच्या पर्यावरण संबंधी विभागाचे कांही काम पाहते आहे असेही समजते. २०१३ साली येल विद्यापीठातून इशाने पदवी मिळवली असून गतवर्षी रिलायन्सच्या वार्षिक सभेला तिने हजेरी लावली होती. १६ व्या वर्षीच फोर्ब्ज च्या तरूण अब्जाधीशांच्या यादीत दुसरे स्थान मिळविल्यापासून इशा एकदम प्रकाशात आली होती. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सचा कारभार १३३९.१७ कोटींचा आहे तर इशा नोकरी करत असलेल्या मॅकेंझीचा कारभार ४७० अब्ज रूपयांचा आहे.