मुंबई : महाराष्ट्रात सहा महिन्यांनंतर विधानसभा निवडणुका होत आहेत. त्या निवडणूकीत गेल्या काही वर्षांपासून आमचा मित्रपक्ष असलेला शिवसेनेसोबतच आमची युती असणार आहे. आम्ही त्याशिवाय इतरपक्षासोबत मैत्री करणार नसल्याचे मत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांनी व्यक्त केले. मुंबई येथे आयोजीत करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला ३०० जागा मिळतील. भाजपाने प्रचारावर दहा हजार कोटी रुपये खर्च केले असल्याच्या काँग्रेसच्या आरोपाबाबत ते म्हणाले की, मी निवडणुकीनंतर सर्व खर्चाचा हिशेब देईन. काँग्रेसच्या सत्ताकाळात झालेल्या ५ लाख कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचा हिशेब त्या पक्षाने द्यावा.
गेल्या ब-याच वर्षांपासून महाराष्ट्रात शिवसेना हा आमचा मित्र पक्ष होता, आहे आणि राहील. तथापि, खासदार गोपीनाथ मुंडे यांनी मनसेचा पाठिंबा घेतला आहे याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, बीडमध्ये मनसेचा उमेदवार नव्हता, त्यामुळे पाठिंबा घेतला आहे. मनसेबरोबर लोकसभा निवडणुकीत भाजपाने गुप्त समझोता केलेला नसल्याचे राजनाथसिंह यांनी स्पष्ट केले.