राणेंविरोधात अब्रुनुकसानीचा दावा!

सावंतवाडी – उद्योगमंत्री  नारायण राणे यांनी आपल्यावर कोणतीही राजकीय टीका केली असती, तरी एकवेळ ते चालले असते. मात्र, त्यांनी माझ्या कुटुंबावर, वडिलांवर टीका केली.  त्यामुळे माझा व्यक्तिगत अपमान झाला आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात मी अब्रुनुकसानीचा दावा न्यायालयात ठोकणार आहे. त्यासाठी मी त्यांना आवश्‍यक ती नोटीस बजावली आहे,असे राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले आणि आमदारकीचा राजीनामा देणाऱ्या दीपक केसरकर यांनी सांगित.  


राणे यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर आमदार केसरकर यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन राणेंच्या टीकेला उत्तर देताना अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा देणारी नोटीस पाठविल्याचे त्यांनी सांगितले. 
 

मी रस्त्यावरचा आमदार आहे, हे मला मान्य आहे. सर्वसामान्यांसाठीच मी काम करतो आणि करणार आहे. एसीमध्ये बसून काम करण्याची मला सवय नाही, असे प्रत्युत्तर  केसरकर यांनी दिले. खासदार नीलेश राणे यांना निवडून आणण्यासाठी मागच्या निवडणुकीत मी आठ दिवस घरी न येता मतदारसंघात फिरत होतो.तेंव्हा  लोकांच्या घरी राहत होतो.याची आठवणही केसरकर यांनी यावेळी करून दिली.