नारायण राणेंची नाचक्की होणार का?

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातील उमेदवाराचे भवितव्य आजच्या मतदानाने ठरणार आहे. काँग्रेसचे नीलेश राणे आणि शिवसेनेचे विनायक राऊत यांच्यात कोण बाजी मारणार, याविषयी तर्कवितर्क लढवले जात असले तरी काँग्रेसला विशेषतः राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांना मोठी कसरत करावी लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या नाकीनऊ आणले. उसने अवसान आणून त्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांना यावेळी बराच आटापिटा करावा लागला. त्यामुळे नारायण राणे यांच्यावर नाचक्कीची वेळ येणार काय असे प्रश्‍न सध्या सिंधुदुर्ग मतदार संघातील मतदात्यांना व काँग्रेस श्रेष्ठींना पडला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून राणे आणि केसरकर यांच्यात विस्तव जात नव्हता. अनेक मुद्दयांवरून त्यांच्यात टोकाचे मतभेद झाले होते. त्यांच्यात शेवटपर्यंत समेट झाला नव्हता. निवडणुकांचा प्रचार सुरू झाल्यानंतर केसरकर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ऐन रणधुमाळीत सावंतवाडी तालुका राष्ट्रवादीने नीलेश राणे यांचा प्रचार न करण्याचा निर्णय घेतला. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही. राणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना साकडे घातले. पवारांनी आपल्या पद्धतीने कार्यकर्ते आणि पदाधिका़र्‍यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण तोही फोल ठरला.

केसरकरांनी आमदारकीचा राजीनामा दिला. याआधी राष्ट्रवादीच्या 400 जणांनी राजीनामे दिले होते. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादीची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. या सर्व घटनांकडे बारकाईने पाहिले तर राष्ट्रवादीची ही रणनीती आधीपासूनच ठरली होती की काय अशी शंका येते. कारण काँग्रेसला मदत न करण्याचा निर्णय केसरकर एकटयाने घेऊ शकत नव्हते. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांच्या सहमतीशिवाय अशा प्रकारचा निर्णय होऊ शकत नाही, हे कुणीही राजकीय जाणकार सांगू शकेल.

रत्नागिरी-सिंधुदुर्गात राष्ट्रवादीच्या ताब्यात सुमारे तीन लाख मते आहेत. या मतांचा निवडणुकीच्या निकालावर परिणाम होऊ शकतो. नारायण राणे यांना निवडणूक जिंकण्याचे तंत्र अवगत आहे. प्रचाराच्या अखेरीस ते आपली खास पद्धत वापरतात, असा आजवरचा अनुभव आहे. राणे जेवढ्या मतांनी निवडून त्याच्यापेक्षा जास्त मतांनी निलेश राणे निवडून येणार का यावर सशंकता निर्माण झाली आहे. त्यांना यावेळी किती यश मिळते याची उत्सुकता समस्त कोकणवासियांना आहे. रत्नागिरीत काँग्रेसची ताकद जेमतेम आहे. या ताकदीवर रत्नागिरी जिल्हयातून आघाडी घेणे अशक्य आहे, याची राणे यांना चांगलीच जाण आहे. म्हणून काहीही करून राष्ट्रवादीसोबत असलेला वाद मिटवण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. पण त्यात त्यांना यश आले नाही. या सर्व परिस्थितीत नीलेश राणे किती मते मिळवतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांचा कुठेही प्रचारात सहभाग दिसला नाही. एकूणच राष्ट्रवादीने राणे यांना प्रचारात वाकुल्या दाखवल्या. राणे यांनी राष्ट्रवादीचे राज्याचे नेते अजित पवार यांच्याही सभा दोन्ही जिल्हयात लावल्या. अजित पवार आपल्या कार्यकर्त्यांना तंबी देऊन प्रचारात सहभागी होण्याचे आवाहन करतील अशी अटकळ होती पण तीही फोल ठरली. त्यांनी अगदीच गुळमुळीत भूमिका घेत आघाडीचा धर्म पाळण्याची विनंती केली. कार्यकर्ते आणि पदाधिका़र्‍यांना अजित पवारांची ही वेगळी भाषा चांगलीच समजली, असे मानायला हरकत नाही.


मोदी यांच्या प्रचाराच्या हवेने कोकणातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जान आली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेचा अपवाद वगळता युतीच्या कोणत्याही बडया नेत्याची सभा कोकणात झाली नाही. तरीही दोन्ही पक्षांमध्ये चांगला समन्वय दिसला. युतीतील तिसरा घटक पक्ष आरपीआयचे कार्यकर्ते मात्र प्रचारात फारसे दिसले नाहीत. आम आदमी पार्टीच्या उमेदवाराने पदयात्रा काढून वातावरणात रंगत आणली. राणे यांना टीकेचे लक्ष्य करत काहीवेळा खळबळ उडवून दिली. काही ठिकाणी बाचाबाचीचे प्रसंग वगळता यावेळी प्रचार शांततेत झाला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघ हा संवेदनशील घोषित करण्यात आल्यानंतर अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. कुठेतरी गोंधळ होणार असा अंदाज बांधला होता पण प्रशासन आणि पोलिसांनी काटेकोरपणे परिस्थिती हाताळली. आता मतदान किती टक्के होते व त्यानंतर येणार्‍या निकालाची उत्सुकता आहे.

Leave a Comment