प्रचाराच्या तोफा थंडावल्या

मुंबई लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील  दुस-या टप्प्यातील मतदानाच्या तोफा मंगळवारी  थंडावल्या. आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जीवाची घालमेल करणाऱ्या उमेदवारांना आराम मिळाला आहे. मात्र  उमेदवार ,पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यासाठी उद्याचा दिवस ‘रात्र-वैऱ्या’ची या धर्तीवर असणार आहे.  दि १७ एप्रिलला महाराष्ट्रातील दुस-या टप्प्यातील आणि देशातील पाचव्या टप्प्याचे मतदान होणार आहे.राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण येथील १९ मतदारसंघामधील ३५८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दुस-या टप्प्यात महाराष्ट्रातील एकूण ३.२६ कोटी मतदार या ३५८ उमेदवारांचे भवितव्य निश्चित करणार आहेत. 
एकूण मतदारांपैकी एक कोटी ६९ लाख ५४ हजार ३९१ पुरुष तर एक कोटी ५३ लाख ७७ हजार ६०५ महिला मतदारांचा समावेश आहे.देशाच्या राजकारणातील प्रमुख नेते केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, भाजपचे ज्येष्ठ नेत गोपीनाथ मुंडे यांचे भवितव्य १७ एप्रिलला निश्चित होणार आहे. 

२१० अपक्ष तर २४ महिला उमेदवार
राज्यातील १९ मतदारसंघातील एकूण २३५ उमेदवारांपैकी २१० अपक्ष उमेदवार असून २४ महिला उमेदवार आहेत.या टप्प्यात मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, बीड, परभणी, उस्मानाबाद आणि लातूरमध्ये तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, बारामती, शिरुर, मावळ, सोलापूर, माढा, सांगली,सातारा, कोल्हापूर, हातकणंगले येथे, उत्तर महाराष्ट्रातील शिर्डी, अहमदनगर आणि कोकणमधील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे.

Leave a Comment