सिंधूदुर्ग- भाजपने लोकसभा निवडणूकीसाठी मनसेसोबत समझोता केला आहे. त्यामुळेच मनसेने नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाला पाठिंबा दर्शविला आहे. असे असताना शिवसेनामात्र भाजपच्या पाठीमागे लागून फरफटत चालली आहे. शिवसेनेकडे जर स्वाभिमान शिल्लक असेल तर त्यांनी भाजपसोबतची युती तोडून टाकवी असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
सावंतवाडी येथे काँग्रेसचे उमेदवार डॉ. नीलेश राणे यांच्या प्रचारार्थ आयोजीत करण्याात आलेल्या सभेत पृथ्वीराज चव्हाण बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते उद्योगमंत्री नारायण राणे, संपर्कमंत्री उदय सामंत, उमेदवार डॉ. नीलेश राणे, खासदार भालचंद्र मुणगेकर, राजन तेली, संदेश पारकर, सतीश सावंत, प्रवीण भोसले, प्रसाद रेगे, व्हिक्टर डॉन्टस आदी उपस्थित होते.
वाजपेयी सरकार केंद्रात आले तेव्हा घटनेचे पुनर्विलोकन करण्याचा निर्णय भाजपने घेतला व त्यामुळे एकाधिकारशाही, हुकूमशाही आणण्याचे स्वप्न पाहणारे संधी मिळेल तेव्हा छुपा अजेंडा राबवतील असा इशारा मुख़्वयमंत्री चव्हाण यांनी दिला. नरेंद्र मोदी एकाधिकारशाहीसारखे उमेदवार असून केंद्रिस्त सत्ता भ्रष्ट असते असे शरद पवार यांनी म्हटले आहे. भारत देशातून धान्य १८ देशात निर्यात होत असून ३२ हजार कोटींचे परकीय चलन मिळविणारा देश बनला आहे. जगात तांदूळ निर्यात करण्यात भारत प्रथम आहे. त्यात कोकणचा वाटा आहे असे पवार म्हणाले.