सिंधुदुर्ग – देशाचा प्रश्न असताना सर्वांनी मतभेद -मनभेद बाजूला ठेवून एकत्र यायला हवे ,पण काय माझ्या पक्षातील काही लोकांना ऐनवेळी अवदसा आठवली अशी खंत व्यक्त करताना केंद्रिय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्यावर कारवाई होणारच, असा खणखणीत इशारा सिंधुदुर्गमधील प्रचार सभेत दिला .
सावंतवाडी येथे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे रत्नागिरी- सिंधुदूर्ग मतदारसंघाचे उमेदवार डॉ. निलेश राणे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.लोकसभेच्या उमेदवारांची घोषणा झाल्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादी अंतर्गत धुसफूस असल्याची चर्चा होती. त्या चर्चेला शरद पवार यांनी यावेळी पूर्णविराम दिला .यावेळी पवार म्हणाले , काही लोकांना स्थानिक राजकारण आणि देशाचे हित यातला फरकच कळत नाही.माझ्या पक्षातील काही लोकांना याचवेळी अवदसा आठवली.
एकत्र काम करत असताना भांड्याला भांडे लागते. पण ज्यावेळी देशाचा प्रश्न येतो. तेव्हा सर्व मतभेद आणि मनभेद विसरून देशाचा विचार करायला हवा. देशाच्या निवडणूकीत आघाडी म्हणूनच आपल्याला काम करायला हवे, असे मत पवार यांनी व्यक्त केले.