अकलूज – माथाडी कामगारांच्या मेळाव्यात ‘गंमती’नं दोनवेळा मतदान करण्याचा ‘सल्ला’ देणारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना निवडणूक आयोगाची माफी मागावी लागण्याचे प्रकरण अजूनही ताजे असतानाच पवारांनी आता निवडणूक आयोगालाच ‘लक्ष्य’ केले आहे.विशेष म्हणजे निवडणुक आयोगाकडून टाकण्यात येणाऱ्या धाडीना त्यांचा आक्षेप आहे.
मुंबईत माथाडी कामगारांच्या सभेत मतदानाची तारीख हा धागा पकडून पश्चिम महाराष्ट्रातून मुंबईत स्थिरावलेल्या कामगारांना पवारांनी साताऱ्यात मतदान केले की मुंबईत येवून दुसर्यांदा मतदान करा; पण बोटावरची शाई पुसून टाकण्याची खबरदारी बाळगा ,असा सल्ला दिला होता. मात्र तो त्यांच्या अंगलट आल्याने निवडणूक आयोगाकडे त्यांनी माफी मागून प्रकरण मिटवून टाका असे साकडे घातले होते. हे प्रकरण अजून ताजे असताना मतांच्या समीकरणासाठी पवारांनी आता निवडणूक आयोगाच्या विरोधात पवित्रा घेतला आहे.
अकलूजमध्ये पत्रकारांशी बोलताना आयोगाकडून ठिकठिकाणी टाकण्यात येणाऱ्या धाडीवरून नाराजी दर्शविताना हे आता अतिच होत आहे, निवडणुका जाहीर झाल्यापासून निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून तब्बल 16 कोटींहून अधिक रक्कम जप्त केली आहे. हे सगळे छापे आणि धाडी व्यापाऱ्यांना त्रास देण्यासाठी सुरु आहे, त्यामुळे आता आयोगाविरोधात तक्रार करण्याचा विचार सुरु असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.