भाजपकडून लोकशाहीची टवाळी : शरद पवार

पिंपरी –  निवडणुकीच्या आधीच भाजपने पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या लोकशाहीच्या विचारावर अतिक्रमण करण्याचा, त्याची टवाळी करण्याचा हा प्रकार आहे, अशी जळजळीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी शुक्रवारी भोसरी येथे केली.

शिरुर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार देवदत्त निकम यांच्या प्रचारार्थ भोसरी माळरानावर शरद पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उमेदवार निकम, विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, आमदार विलास लांडे, महापौर मोहिनी लांडे, सत्तारुढ पक्षनेत्या मंगला कदम, स्थायी समितीचे सभापती महेश लांडगे, काँग्रेसचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षा सुरेखा लांडगे, नगरसेवक वसंत लोंढे, अजित गव्हाणे, दत्ता साने आदी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले की, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मागण्याचा व निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. मात्र भाजप, शिवसेना मताच्या अधिकारावरच हल्ला करु पाहत आहे. लोकशाहीमध्ये निवडणुका होत असतात. उमेदवाराला मत दिले जाते. कोणत्या तरी पक्षाला बहुमत मिळते. ज्या उमेदवाराला बहुमत मिळते. त्याचा पंतप्रधानपदासाठी विचार होतो. मात्र, अद्याप निवडणूक व्हायची आहे. कोणाला बहुमत मिळणार, कोण निवडून येणार याचा पत्ता नाही. त्याच्या आधीच भाजपने पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करण्याची घाई केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशाला लोकशाहीचा विचार दिला आहे. त्यावर अतिक्रमण करण्याचा, त्याची टवाळी करण्याचा हा प्रकार आहे, असे पवार म्हणाले.

नरेंद्र मोदी यांच्यावर शरद पवार यांनी नेहमीच्या शैलीत टीका केली. त्यांना देशाचा इतिहास माहिती नाही. त्यांच्याबद्दल सर्व जातीधर्मियांबद्दल विश्वास वाटत नाही. अशांकडे देशाची सूत्रे देणार का, असा सवाल त्यांनी केला. गुजरातच्या विकासाचा बागुलबुवा केला जात आहे. विकासामध्ये महाराष्ट्र गुजरातपेक्षा आघाडीवर आहे. मात्र, भाजप-शिवसेना सत्य व वस्तुस्थितीचा विपर्यास करुन मत मागत आहेत. लोकशाहीमुळे हिंदुस्थानची इतर देशांमध्ये उंची आहे. ही उंची कायम ठेवण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचे त्यांनी सांगितले. 

Leave a Comment