मामाच्या प्रचाराच्या निमित्ताने ‘दादां’चे चिरंजीव राजकारणात !

तुळजापूर – सत्तेच्या सारीपाटात घराणेशाही कशी घट्ट असते याचा प्रत्यय नेहमीच येतो . विशेषत;राजकीय व्यक्तीची पुढची पिढी ही राजकारणात सक्रिय होण्यासाठी निवडणुकीचाच ‘मुहूर्त’ शोधते हा आजवरचा अनुभव उभ्या महाराष्ट्राला आहे. यंदाच्या लोकसभेचा मुहूर्त साधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चिरंजीवाने राजकारणात प्रवेश केला आहे . मामाच्या प्रचारासाठी पार्थ अजित पवार हे निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत.  

उस्मानाबादचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पद्मसिंह पाटील यांच्या प्रचारादरम्यान निघालेल्या रॅलीत तिसरे पवार सामील झालेले सर्वाना दिसले .परदेशात मॅनेजमेंटचे शिक्षण घेणारे पार्थ यावेळी शांतपणे जनतेला अभिवादन करतांना दिसले. गळ्यात राष्ट्रवादीचा रूमाल, चेहऱ्यावर स्मितहास्य, आणि दोन्ही हात जोडून नम्रपणे नमस्कार  करणारे पार्थ कसलेल्या राजकारण्याप्रमाणे यावेळी जनतेत मिसळतांना दिसत   होते. त्यामुळे अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ आपल्या मामांच्या प्रचारात सामील होऊन राजकीय कारकीर्द तर सुरू करतात का ?याकडेच आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.   पद्मसिंह पाटील यांच्या मतदारसंघात सुप्रिया सुळे, अजित पवार आणि शरद पवार अशा सगळ्याच पवारांनी सभा घेतल्या आहेत. त्यात आता पार्थ यांच्या रूपाने तिसरी पिढी राज्याच्या राजकारणात सक्रिय झाली आहे .

Leave a Comment