आघाडीत ‘राडा’ , राणे पिता-पुत्रांचीच कोंडी

रत्नागिरी – कॉंग्रेसचे वरिष्ठ आणि शक्तिमान नेते नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे यांच्या प्रचाराकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पाठ फिरविल्याने आघाडीत आता बिनसले आहे. राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांनी कोणत्याही परिस्थितीत राणेंचा प्रचार नाही या भूमिकेवर ठामपणा दर्शविला आहे शिवाय पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या सभेवरही बहिष्कार घातला आहे. केसरकर यांच्या भूमिकेवरून कॉंग्रेसने राष्ट्रवादीला खिंडीत गाठले असले तरी या दोन्ही पक्षातील वाद आता शिगेला पोहचला आहे. त्यामुळे राणे पिता-पुत्रांचीच कोंडी झाली आहे. 
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची विशेषतः आमदार केसरकर यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करण्यात आला, प्रदेशाध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी साहेबांचा आदेश पाळा असे ‘साकडे’ घातले तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारवाईचे संकेत दिले मात्र कोणताच  परिणाम झाला नाही उलट केसरकर आणि कार्यकर्ते त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. 
आघाडीतील टोकाला पोहोचलेला वाद शमविण्यासाठी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयात दोन्ही पक्षांची बैठक झाली पण संतप्त झालेल्या कॉंग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना फैलावर घेतल्याने प्रकरण बिनसले आणि हमरी-तुमरीचा राडा  घडल्याने राष्ट्रवादीने कॉंग्रेसच्या कार्यालयातून बाहेरचा मार्ग धरला .त्यामुळे राष्ट्रवादीला खिंडीत गाठण्याचा कॉंग्रेसने केलेला  डाव त्यांच्यावरचा उलटला असून आमदार केसरकर यांनी कॉंग्रेसवर केलेल्या आरोपालाही पुष्टी मिळाली आहे. त्यामुळे आता राणे पिता-पुत्रांची कोंडी झाली आहे. 

Leave a Comment