आघाडीचा धर्म म्हणजे काय?

महाराष्ट्रात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात आघाडी आहे. पण ती आघाडी नीट चालत नाही. ते एकमेकांच्या हातात हात असल्याचा देखावा करतात पण प्रत्यक्षात एकमेकांच्या पायात पाय घालतात. अधूनमधून एक पक्ष दुसर्‍या पक्षाला आघाडीचा धर्म पाळण्याची आठवण करून देत असतो आणि अशा रितीने त्यांची आघाडी चाललेली आहे. पण एक गोष्ट खरी की निवडणुकीच्या वेळेस ते आघाडीचा धर्म पाळतात. असे असले तरी आता सिंधुदुर्ग – रत्नागिरी मतदारसंघात नारायण राणे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसला आघाडीच्या धर्माची आठवण करून द्यावी लागत आहे. एरवी जनतेच्या हिताचे प्रश्‍न समोर येतील तेव्हा आघाडी धर्म पाळला नाही तरी चालेल पण राजकीय स्वार्थ  पणाला लागताच तेव्हा तरी आघाडीचा धर्म पाळला पाहिजे असा या दोन पक्षामध्ये अलिखित करार आहे. या मतदार संघातले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते हीच गोष्ट पाळायला तयार नाहीत आणि नारायण राणे यांचे सुपूत्र खासदार निलेश राणे यांची निवडणूक धोक्यात आली आहे. हे प्रकरण एवढे चिघळण्याची शक्यता आहे की, राष्ट्रवादीने या ठिकाणी आघाडीचा धर्म पाळला नाही तर राणे महाराष्ट्रातल्या अन्य मतदारसंघात हा धर्म मोडून राष्ट्रवादीचे नुकसान करण्याची शक्यता आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या मतदारसंघात कॉंग्रेसचे उमेदवार निलेश राणे यांचा प्रचार करण्यास नकार दिला आहे. या दोन पक्षात आघाडी असल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रचार करणे अपेक्षितच आहे. मात्र या मतदारसंघातल्या अंतर्गत संघर्षामुळे कार्यकर्ते हट्टाला पेटले आहेत. त्यांना समजावून सांगितले तरीही ते आपला हट्ट सोडायला तयार नाहीत. याबाबत राणे यांनी आपले म्हणणे खरे केले तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला हादरा बसू शकतो. राष्ट्रवादीच्या दोन-चार जागांवर तरी ते परिणाम करू शकतात. मुळात राष्ट्रवादीला आपली आहे ती ताकद टिकवण्याची धडपड करावी लागत आहे. त्यातच राणेंनी इशारा खरा केला त्यांची अवस्था वाईट होणार आहे. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची ही भूमिका अगदीच चूक आहे असे नाही. राणे यांनी गेली पाच वर्षे या जिल्ह्याचे राजकारण करताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना कस्पटासमान लेखून त्यांची केवळ उपेक्षाच नाही तर अपमानही केला आहे. परिणामी आजची स्थिती निर्माण झाली आहे. राणे यांनी या बाबत शरद पवार यांच्याशी संपर्क साधला आणि आघाडीचा धर्म पाळावा असे आवाहन केले. पवारांनी तसे आदेश काढले पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एवढ्या टाेकाला गेले आहेत की, पवारांनी आपल्याला तसा आदेश दिला आणि राणे यांचा प्रचार करण्याबाबत दबाव आणला तर आपण पक्ष सोडू असे म्हणून सुमारे ४०० कार्यकर्त्यांनी आपले राजीनामेही दिले आहेत. 

कार्यकर्ते काम करीत नाहीत म्हणून आघाडीचा धर्म पाळत खुद्द अजित पवार तिथे प्रचाराला गेले पण तिथल्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी त्यांच्या सभेला हजेरीही लावली नाही. म्हणजे त्यांनी अजित पवारांनाही जुमानले नाही. या प्रकरणात राजकीय पक्ष म्हणजे नेमके काय असा प्रश्‍न पडला आहे. पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना आदेश द्यायचा असतो पण त्यांनी तो मानला नाही तर काय करणार? या दोन पक्षांनी आघाडी करताना जातीयवादी शक्तींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आघाडी करत असल्याचे म्हटले असले तरी ती केवळ भोंदूपणाची भाषा असते. प्रत्यक्षात वैयक्तिक राग-लोभ आणि लाभालाभाचे मुद्दे समोर येतात तेव्हा त्यांचा स्वार्थाचा फणा उगारला जातो आणि ते परस्परांना डसायला लागतात. आता या प्रकरणात तसेच घडले आहे. कार्यकर्ते नेत्यांना जुमानत नाहीत. त्यावर नेत्यांनी काय करावे? फार त्या कार्यकर्त्यांना पक्षातून काढून टाकणार. पण आजकाल कोणीच पक्षातून काढून टाकण्याची पर्वा करीत नाही कारण या पक्षातून त्यांना काढले तरी त्यांना आत घ्यायला शिवसेना तयारच आहे. पक्षातून काढले जाणे हे काही त्यांना संकट वाटतच नाही. त्यामुळे कार्यकर्ते नेत्यांचे आदेश मोडत आहेत आणि नेते हतबल झाले आहेत. 

कार्यकर्ते आदेश का मानत नाहीत? त्यांना आघाडीचा धर्म कळत नाही का? कळतो, पण आघाडीचा धर्म नावाचा प्रकार काय असतो आणि आपले नेतेच तो धर्म कसा धाब्यावर बसवून राजकारण करतात हे त्यांना अनेकदा पहायला मिळालेले असते. तेव्हा आघाडीचा धर्म वगैरे शब्दांची भुरळ त्यांना पडत नाही. ते आपले आदेश मानत नाहीत म्हणून त्यांना पक्षातून काढून टाकावे तर त्यामुळे त्यांचे काही नुकसान होत नाहीच पण आपल्या पक्षाचेच नुकसान होते याची जाणीव नेत्यांना आहे. अशा रितीने पक्ष नावाची काही संघटना, तिची शिस्त या गोष्टींना काही अर्थ राहिलेला नाही. म्हणून अजित पवारांनाच आघाडीचा कथित धर्म पाळत राणे यांच्या प्रचारासाठी कणकवलीत जाऊन सभा घ्यावी लागली. २००९ च्या निवडणुकीत अजित पवार यांनी नेमका असाच प्रकार केला होता. पुण्यात कॉंग्रेसचे उमेदवार सुुरेश कलमाडी यांचा प्रचार करण्यास त्यांनी नकार दिला होता. कलमाडी यांनी शरद पवारांना आघाडीच्या धर्माची आठवण करून दिली. त्यावर पवारांनी अजित पवारांना पुण्यात कलमाडींच्या प्रचाराला जाण्याचा आदेश दिला. आज सिंधुदुर्गचे कार्यकर्ते अजित पवारांचा आदेश धुडकावून लावतात तसा अजित पवारांनी शरद पवारांचा आदेश धुडकावला होता आणि त्यावर शरद पवारांना स्वत:लाच पुण्यात येऊन कलमाडींचा प्रचार करणे भाग पडले होते. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या संबंधात आघाडीचा धर्म हा शब्द उच्चारण्याचा कोणालाच अधिकार राहिलेला नाही.

Leave a Comment