निवडणुका कशासाठी ?

निवडणुकांचे एकेक टप्पे पार पडत आहेत आणि लोक मतदानास सज्ज होत आहेत. परंतु आपला खासदार कसा असावा याविषयी लोकांच्या मनात खूपच गैरसमज आहेत. आपले प्रश्‍न सोडवणारा खासदार, आपले परवाने मिळवून देणारा खासदार, बदल्या करणारा खासदार हा खरा खासदार होय असा लोकांचा समज असतो. त्यामुळे बरेच खासदार आपण किती सडका केल्या, कोणाकोणाला निधी मिळवून दिला आणि लोकांची कामे कशी केली हे मतदारांना पटवून द्यायला लागतात आणि त्याच आधारावर मतदारही मतदान करतात. खरे म्हणजे लोकसभेचे आणि विधानसभेचे काम कायदे करणे हे आहे. तेव्हा आपण निवडून देत असलेला खासदार कायदे तयार करण्याच्या कामात किती वाकब्गार आणि सक्षम आहे याचा विचार मतदारांनी केला पाहिजे. या बाबतीत मतदारांचे प्रबोधनसुध्दा होण्याची गरज आहे. अन्यथा खासदार निधीतून मतदारसंघातल्या किती स्मशानभूमींना तारांचे कुंपण टाकून दिले हेच खासदारपदाचे क्वालिफिकेशन ठरायला लागते. यावर्षीच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य असे की शासन आणि स्वयंसेवी संघटना यांच्या पातळीवर लोकांनी मतदान करावे यासाठी मोठा प्रयत्न सुरू झाला आहे. 

भारतात मोठ्या प्रमाणात स्थलांतर आहे. त्यामुळे लोकसभेला कमी मतदान होते असा अनुभव आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदार अधिक आवर्जुन मतदान करतात. कारण त्या निवडणुकीत एकेका मताची किंमत मोठी असते आणि उमेदवार मतदारांच्या परिचयाचे असतात. मात्र लोकसभेला असा प्रकार घडत नाही. १५-१६ लाखांच्या मतदानात एखाद्या मताचा मोठा फरक जाणवेल असे संभवतही नाही  आणि मतदान केंद्रापासून लांब लांब गेलेल्या लोकांना मतदानासाठी घेऊन आणणारे कार्यकर्ते आता राहिलेले नाहीत. त्यामुळे लोकसभेला मतदान कमी होते. असे असले तरी यावर्षी सर्वसामान्य माणूस मतदानाच्याबाबतीत अधिक जागरूक झालेला दिसत आहे. निवडणूक कोणतीही असो प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे. हा आग्रह लोकांच्या मनात जागा होत आहे. यावेळी भारतात तरुण मतदारांची संख्या मोठी आहे. तरुणांच्या विचारांचा कल कसा आहे यावर या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे आणि तेच या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरणार आहे. तेव्हा या तरुण मतदारांनी आणि एरवीही मतदारांच्या बाबतीत उदासीन असणार्‍या प्रौढ मतदारांनीही आवर्जुन मतदान करण्याची गरज आहे.  मतदानास पात्र असणारे लोक मतदान करत नाहीत म्हणून निवडून येण्यास अपात्र असणारे लोक निवडून येत असतात. हे मतदान न करण्याकडे कललेल्या मतदारांनी लक्षात घेतले पाहिजे. 

लोकांची मतदानाकडे आणि निवडणुकीकडे बघण्याची दृष्टी हीसुध्दा सुधारण्याची गरज आहे. लोकसभेची निवडणूक म्हणजे देशाच्या राष्ट्रीय राजकारणाशी निगडीत निवडणूक आहे. तेव्हा देशाच्या प्रश्‍नांचा विचार करून, सरकारच्या कामगिरीचा विचार करून तसेच उमेदवारांचे चारित्र्य, वागणूक, दृष्टिकोन यांचा विचार करून उमेदवार निवडला पाहिजे. मात्र असे न करता काही लोक लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या सभांमध्ये राष्ट्रीय प्रश्‍नांच्याऐवजी स्थानिक प्रश्‍नांचे चर्वितचर्वण करत असतात. म्हणून मतदारांनी यावेही तरी राष्ट्रीय प्रश्‍नांचा विचार करावा. उमेदवारांनीही राष्ट्रीय प्रश्‍न जनतेसमोर मांडावेत. त्यावरची आपली अभ्यासू मते जनतेसमोर ठेवावीत त्यांच्या अनुषंगाने जनतेचे प्रबोधन करावे हेच योग्य आहे. सध्या नेते मंडळींना  भाषण काय करावे असा प्रश्‍न पडला आहे आणि ते वैयक्तिक निंदा नालस्ती करण्यावर भर देत आहेत. अगदी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचीही अशीच गोची झालेली आहे. पूर्वीच्या काळी किंवा अगदी अलीकडेसुध्दा संसद गाजवून सोडणारे काही नेते होते. 

सरकार एखादा कायदा करत असेल तर तो किती चुकीचा आहे, त्यातल्या तरतुदी कशा घातकी आहेत याचे विवेचन करून हे नेते सरकारला धारेवर धरत असत. कायद्यामध्ये योग्य ते बदल करायला भाग पाडत असत. ते संख्येने कमी असले तरी असे अभ्यासू १०-१२ खासदार सरकारला सळो की पळो करून सोडत असतात. कारण त्यांचा त्या विषयाचा अभ्यास होता. संसदेतल्या विधेयकाच्या निमित्ताने आपण काय केले. येणार्‍या पाच वर्षात संसदेसमोर कोणती विधेयके येणार आहेत याची चर्चा खासदारांनी केली पाहिजे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी आपल्या सभा आखडत्या आणि आटोपत्या घ्यायला सुरूवात केली आहे. मुळात त्यांच्याविषयीचे आकर्षण बरेच कमी झाले आहे. त्यामुळे त्यांच्या भाषणातल्या गमतीजमती, नकला आणि शिवराळ भाषा ऐकण्यास लोकांची फारशी गर्दी उसळेनाशी झाली आहे. पुन्हा पुन्हा तेच ते काय बोलणार आणि किती वेळा बोलणार असा प्रश्‍न त्यांना पडला आहे. साहजिक आहे अनेक सभांमध्ये अनेक विषयांवर बोलण्यासाठी ज्ञान असावे लागते, प्रचंड अनुभव असावा लागतो, चिंतन करावे लागते आणि निरीक्षणही करावे लागते.  शिवाय आपण ज्या पक्षाचा प्रचार करत आहोत त्या पक्षाचे काही एक तत्त्वज्ञान असावे लागते. शरद पवार आणि राज ठाकरे या दोघांचीही हीच खरी अडचण आहे. त्यांचे पक्ष कोणत्या तत्त्वज्ञानावर आधारलेले आहेत हे त्यांना सांगता येणार नाही. राज ठाकरे यांचे तत्त्वज्ञान म्हणजे मुंबईत आलेल्या बिहारी लोकांना हुसकावून लावणे. अशा प्रकारच्या उथळ तत्त्वज्ञानावर पक्ष उभा असेल तर त्या पक्षाचे तत्त्वज्ञान किती वेळा आणि कोणकोणत्या वेगळ्या पध्दतीने समजून सांगावे असा प्रश्‍न त्यांना पडू शकतो.

Leave a Comment