कोकणांत निलेश राणे अडचणीत

मुंबई – रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुक लढवित असलेले काँग्रेसचे वरीष्ठ व पॉवरफुल नेते नारायण राणे यांचे चिरंजीव डॉ. निलेश राणे अडचणीत सापडले असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी राणे यांच्या प्रचारास नकार दिला आहेच पण त्यांच्यावर प्रचारासाठी दबाव येताच राष्ट्रवादीच्या ४०० कार्यकर्त्यांनी त्यांचे राजीनामे जिल्हाध्यक्ष बाळा भिसे यांच्याकडे दिले असल्याचे समजते. राणे यांच्या प्रचारासाठी शरद पवार आणि अजित पवार सभा घेणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर हे राजीनामे दिले गेल्याने राणे अडचणीत आले आहेत.

२००९ च्या निवडणुकीत निलेश याच मतदारसंघातून ४६७५० मतांनी विजयी झाले होते. मात्र जैतापूर अणुउर्जा प्रकल्पामुळे या भागात राणेविरोधी वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रवादीचे सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी तर राणे यांनी गेल्या पाच वर्षात ज्या पद्धतीने पक्ष आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा वेळोवेळी अपमान केला आहे ते विसरणे शक्य नसल्याचे सांगितले आहे.

मनसेचे राज ठाकरे यांनी मंगळवारी घेतलेल्या सभेत कोकणवासियांनी कोणताच उमेदवार पसंती नाही साठी असलेला नोटाचा पर्याय वापरावा असे आव्हान केले आहे. गतनिवडणुकीत राणे आणि राज यांच्यातील संबंध चांगले होते तेव्हा मनसेच्या कार्यकर्त्यांनी पडद्याआडून कॉग्रेसला मदत केली होती ती आता राज यांच्या आवाहनामुळे मिळणे अवघड आहे. तसेच येथील विविध १५ प्रकल्पांमुळे बांधित झालेल्या नागरिकांनी काँग्रेसला मतदान न करण्याचा ठराव पास केला आहे. यामुळे यंदाची निवडणक राणे यांना चांगलीच कसोटीची ठरणार असल्याचे मानले जात आहे.

Leave a Comment