अपेक्षांचा झोका आणि अपेक्षाभंगाचा धोका

निवडणुका आल्या की पुढारी लोकांच्यावर आश्‍वासनांची बरसात करतात. मात्र त्या घोषणा व्यवहार्य आहेत की नाही, त्या सत्यात उतरू शकतात की नाही, त्या घोषणांची अंमलबजावणी शक्य आहे की नाही याचा विचार करत नाहीत. त्यांच्या अफाट छप्परफाड घोषणांमुळे लोकांच्या अपेक्षा खूप उंचावतात. परंतु त्या घोषणा अवास्तव असल्यामुळे जेव्हा त्या प्रत्यक्षात येत नाहीत तेव्हा लोकांचा होणारा भ्रमनिरास तेवढा जोरदार आणि तीव्र असतो. पुढार्‍यांनी लोकांना निवडणुकीच्या काळात अफाट आश्‍वासने देऊन मूर्ख बनवणे थांबवले पाहिजे. कदाचित त्यांना अशा आश्‍वासनांचा उपयोग निवडणुकीत होतही असेल पण नंतर आश्‍वासने व्यवहार्य नव्हती हे कळल्यानंतर लोक चिडले तर त्यांचा राग त्यापेक्षाही तीव्र स्वरूपाचा असण्याची शक्यता असते. याचे भान न राहिल्यामुळे भ्रमनिरास झालेली जनता पुढार्‍यांना थपडा मारायला लागली आहे. काल दिल्लीत एका रिक्षाचालकाने आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांचा रोड शो सुरू असताना लाली नावाच्या एका रिक्षाचालकाने त्यांना हार घालण्याचा बहाणा करून त्यांच्या वाहनावर प्रवेश मिळवला आणि तिथेच त्यांना थप्पड मारली. ही थप्पड विलक्षण रागाने मारली असावी. या लालीने केजरीवाल यांचा गाल तर लाल केलाच पण थप्पड विलक्ष रागाने मारल्यामुळे केजरीवालांच्या डोळ्याला जखम झाली. 

केजरीवाल यांनी गांधीगिरी करत  थेट त्या रिक्षावाल्याचे घर गाठले. त्याच्या मनात केजरीवाल यांच्याविषयी कितीही राग असला तरी शेवटी केजरीवाल आपल्या घरी येत आहेत याचा त्याच्या मनावर परिणाम झाला आणि त्याने चक्क केजरीवाल यांची माफी मागितली. त्यांनी माफी मागितली असली तरी केजरीवाल यांच्या मुस्काटात लगावून द्यावी असे त्याला का वाटले याचाही विचार केला पाहिजे. पुढार्‍यांवर असे हल्ले होण्याची ही पहिली वेळ नाही. पी. चिदंबरम् यांच्यावर एका पत्रकार परिषदेत पत्रकाराने चप्पल फेकली होती. त्यानंतर केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनाही एका तरुणाने थप्पड लगावली होती. आता केजरीवाल यांची पाळी आली आहे. लोक आपल्यावर का चिडले आहेत याचा या लोकांनी एकदा नीट विचार केला पाहिजे. आपली कथनी आणि करणी यामध्ये काही फरक आहे का? आपले वागणे ढोंगीपणाचे आहे का? लोक आपल्या बाबतीत एवढे निराश का झाले आहेत?  हे एकदा त्यांनी तपासून पाहिले पाहिजे. 

शरद पवार यांना थप्पड लगावली गेली तेव्हा पवार साहेबांनी त्या तरुणावर काहीही कारवाई करू नये अशी उदात्त भूमिका घेतली. हा जनतेचा राग व्यक्त होत आहे असे ते म्हणाले. निदान या बाबतीत शरद पवार यांनी आत्मपरिक्षणाची भूमिका तरी घेतली. परंतु अरविंद केजरीवाल त्याबाबतीत ढोंगी निघाले. लोक आपल्याला थपडा का मारत आहेत याचा शोध घेण्याऐवजी त्यांनी सवंग भूमिका घेतली आणि हे भाजपा आणि कॉंग्रेसचे कारस्थान आहे असा तिनपाट पुढार्‍यांसारखा आरोप करून टाकला. केजरीवाल यांना या थपडांपासून काही शिकायचे नाही. स्वतःत काही सुधारणा करायची नाही म्हणून त्यांनी भाजपावर आरोप करून मोकळे होण्याची भूमिका घेतली. त्यांचा हा आरोप खरा असेल तर त्यांनी गांधीगिरी करत रिक्षाचालकाची भेट घेतली तेव्हाच त्याच्याकडून त्याला कॉंग्रेसच्या किंवा भाजपाच्या कोणत्या नेत्याने फूस दिली आहे याची माहिती विचारता आली असती. मात्र अशी कोणी फूस दिलेली नाही हे केजरीवाल यांना माहीत आहे. केजरीवाल यांनी या थपडेचा थोडा वस्तुनिष्ठ विचार केला तर त्यांना या थपडेमागे आपले उथळ राजकारण असल्याचे लक्षात येईल. केजरीवाल यांनी आम आदमी पार्टी नावाचा पक्ष स्थापन केला आणि हा पक्ष देशात भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा देईल असे जाहीर केले. 

आपल्या देशामध्ये एक सुशिक्षित लोकांचा असा वर्ग आहे की ज्या वर्गाच्या मनात सगळ्याच राजकीय पक्षांच्या विषयी    चीड निर्माण झाली आहे. शिवाय भ्रष्टाचार हा देशाचा किती मोठा शत्रू आहे याचीही त्यांना जाणीव आहे. त्यामुळे प्रचलित सगळ्या राजकीय पक्षांपासून वेगळा मात्र भ्रष्टाचाराच्या मुक्तीला वाहिलेला असा पक्ष स्थापन झाला आहे असे लक्षात येताच अनेक निवृत्त सनदी अधिकारी, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते, इंजिनियर्स यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला. आम आदमी पक्षाकडून त्यांच्या खूप अपेक्षा होत्या आणि त्या अपेक्षापोटी त्यातल्या कित्येकांनी आपले चांगले करीअर फेकून दिलेले आहे. मात्र आपण ज्या पक्षासाठी किंवा नेत्यासाठी आपले जीवन सर्वस्व अर्पण करतो तो तर राजकीय विदूषक आहे हे लक्षात येते तेव्हा त्यांचा भ्रमनिरास होतो आणि त्यांच्या मनात चीड निर्माण होते. अरविंद केजरीवाल यांनी राजकारणात फार उथळ भूमिका घेतल्या. आपल्या शब्दासाठी आपल्या पक्षात आलेल्या लोकांच्या भावना काय असतील याचा त्यांनी विचारच केला नाही. परिणामी हेच लोक त्यांना आता थपडा मारायला लागले आहेत. लोकांचा राग निर्माण होण्यास त्यांनी निर्माण केलेल्या अवास्तव अपेक्षाच कारणीभूत आहेत याची त्यांना अजून जाणीव होत नाही. त्यामुळे ते अजूनही अवास्तव बोलणे, उथळ डावपेच खेळणे यापासून परावृत्त होत नाहीत. त्यांचे ते राजकारण अजून तसेच सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या थपडा थांबण्याची काही शक्यता दिसत नाही.

Leave a Comment