मुंबई – शक्ती मिल येथे वृत्तछायाचित्रकार तरूणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी तीनही आरोपींना मुंबई सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी महिला अत्याचार कायद्यात केलेल्या सुधारीत कलमानुसार झालेली ही पहिलीच फाशीची शिक्षा आहे.
विजय जाधव, कासिम शेख आणि सलीम अन्सारी या तिघांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. चौथा आरोपी सिराज खान याला जन्मठेपेची सुनावली आहे. महालक्ष्मी येथील शक्ती मिल येथे 22 ऑगस्ट रोजी वृत्तछायाचित्रकार तरुणीवर या नराधमांनी सामूहिक बलात्कार केला होता. त्यापूर्वी याच आरोपींनी जुलै महिन्यात एका टेलिफोन ऑपरेटरवरही बलात्कार केला होता. त्याप्रकरणी न्यायालयाने चार जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या गुन्ह्यातील तीन आरोपींचा छायाचित्रकार तरुणीवरील बलात्कार प्रकरणातही सहभाग होता.
नवीन तरतुदीनुसार या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सरकारी वकील उज्वल निकम यांनी केली होती. दोन सामूहिक बलात्कार प्रकरणी न्यायालयाने पाच जणांना दोषी ठरविले. त्यापैकी दोन्ही बलात्कारप्रकरणी विजय जाधव, मोहम्मद अन्सारी आणि कासिम शेख यांना दोषी ठरवून फाशीची शिक्षा देण्यात आली. अश्फाक शेख याला टेलिफोन ऑपरेटर तरुणीवरील बलात्कार प्रकरणी, तर सिराज खान याला छायाचित्रकार तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी, अशा दोन वेगवेगळया गुन्हयांमध्ये दोषी ठरवले.