पुणे – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांची हत्या होऊन सात महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला असतानाच आता या हत्येचा तपास एसआयटी (विशेष तपास पथक) कडे सोपविण्यात येत असल्याचे पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी नुकतेच जाहीर केले आहे. निवडणकांमुळे अनेक पोलिस अधिकार्यांच्या बदल्या झाल्या आहेत व त्यामुळे या हत्येच्या तपासासाठी विशेष पथक स्थापन केले जात असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.दाभोलकर यांची २० ऑगस्टला सकाळीच जवळून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम सुरूच असून त्यांनी यंदाच्या निवडणुकांत अचूक भविष्य वर्तविणार्या ज्योतिषांसाठी २१ लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी कोल्हापूर येथे नुकतीच ही घोषणा केली. २००९ च्या निवडणुकांतही पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने विज्ञान कसोटीवर ज्योतिष भविष्याच्या वैज्ञानिक चाचण्या संस्थेने घेतल्या होत्या. कारण तेव्हाही ज्योतिषांची वर्तविलेले भविष्य बरोबर आलेले नव्हते असे समजते.
यंदाही ज्योतिषांसाठी २५ पानांची प्रवेशिका अंनिसने तयार केली आहे. वेबसाईटवर नांव नोंदणी करता येणार असून इच्छुकांनी अर्जासोबत ५ हजार रूपयांचा डीडी द्यायचा आहे. कोणत्या पक्षाला बहुमत मिळेल, किती जागा, महाराष्ट्रातील जागांसंबंधीची भाकिते, जिंकणार्या उमेदवारांची टक्केवारी अशी अनेक भाकिते ज्योतिषांनी करावयाची आहेत.