पाक सरकारने १६ तालिबान्यांची केली सुटका

इस्लामाबाद – तहरिक एक पाकिस्तान तालिबान या दहशतवादी संघटनेबरोबर वझिरीस्तानातील गुप्त ठिकाणी सुरू असलेल्या शांतता फेरीतील चर्चेला अधिक मजबूती यावी म्हणून पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी मंजूरी दिल्यानंतर १६ तालिबान्यांची सरकारने मुक्तता केली असल्याचे समजते. तालिबान्यांनी देशाच्या विविध तुरूंगात कैदेत असलेल्या ८०० तालिबान्यांच्या सुटकेची मागणी केली असून आणखी १०० तालिबान्यांना लवकरच मुक्त केले जाईल असेही सांगितले जात आहे.

शांतता चर्चेची ही दुसरी फेरी आहे. १ मार्च पासून तालिबान्यानी पहिल्या शांतता चर्चेनिमित्ताने १ महिना संघर्ष विराम केला होता मात्र त्यांच्या मागण्या मान्य करण्यात सरकारकडून होत असलेल्या दिरंगाईमुळे हा कालावधी वाढविण्यास नकार दिला होता. ८०० तालिबानी सोडावेत आणि अफगाण सीमेला लागून असलेल्या स्वतंत्र भागातून सेना हटवावी अशा त्यांच्या मागण्या आहेत.

सरकारने केलेल्या खुलाशानुसार मुक्त करण्यात आलेले बंदी हे शोधमोहिमेत पकडले गेले होते आणि त्यांच्यावरचे आरोप सिद्ध झालेले नाहीत. गेली २-३ वर्षे हे कैदी तुरंगात आहेत. पहिल्या शांतता चर्चेच्या वेळी २३ जवानांना तालिबान्यांनी अपहरण करून त्यांची हत्या केली हेती व त्यामुळे ती चर्चा तेथेच थांबविली गेली होती. दुसरी फेरी यशस्वी व्हावी आणि तालिबान्यांनी हत्या सत्रे थांबवावीत यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.