एडीआर दक्ष सर्वे- महाराष्टात २७ खासदारांची कामगिरी समाधानकारक

देशात होत असलेल्या लोकसभा निवडणुकांतील ५२५ जागांसाठीचे सर्वात मोठे सर्वेक्षण केल्याचा दावा करणार्‍या एडीआर दक्ष सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रातील ४८ पैकी २७ खासदारांची कामगिरी समाधानकारक असल्याचा कौल मतदारांनी दिला आहे. या सर्वेक्षणासाठी प्रत्येक मतदारसंघातील ५०० मतदारांना प्रश्न विचारले गेले होते.

विशेष म्हणजे मावळचे सेनेचे माजी खासदार व आता मनसेत गेलेले गजानन बाबर यांना मतदारांनी १० पैकी ८.४ गुण देऊन पहिला नंबर दिला आहे. महिला खासदारात बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना ६.४१ गुण मिळून त्या आघाडीवर आहेत तर सर्वात कमी गुण महिला खासदार प्रिया दत्त यांना मिळाले आहेत.त्यांना मतदारांनी त्यांच्या कामगिरीबद्दल केवळ चार गुण दिले आहेत.

विशेष म्हणजे समाधानकारक कामगिरी न बजावलेल्या खासदारांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष व केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, राष्ट्रवादीचेच प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांचीही वर्णी आहे. एकूण ४८ खासदारांपैकी १२ खासदारांनी अपेक्षेपेक्षाही अधिक चांगले काम केल्याचा कौल मतदारांनी दिला आहे. मागील निवडणुकीत पुणे मुंबईत काँग्रेसने चांगले प्रदर्शन केले असले तरी या ठिकाणच्या खासदारांच्या कामगिरीबाबत मात्र मतदार फारसे समाधानी नाहीत असेही यात आढळले आहे.

या सर्वेक्षणात मतदार मतदान करताना कशाला अधिक महत्त्व देतात याचेही सर्वेक्षण केले गेले तेव्हा असे दिसून आले की मतदार प्रथम पक्षाचा विचार करतात, त्यानंतर पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण हे पाहतात, त्यानंतर उमेदवार, जातधर्म आणि मतदानाबद्दल काय गिफ्ट मिळणार याचा विचार करून मतदान करतात. २००९ च्या लोकसभा निवडणुकांत भाजपला ८, सेनेला १०, काँग्रेसला १७ तर राष्ट्रवादीला ७ जागावर विजय मिळाला होता.

Leave a Comment