लकी चिदंबरम

देशात मुक्त अर्थव्यवस्थेचा अंमल सुरू झाला तेव्हा मनमोहन  सिंग हे अर्थ मंत्री होते पण या अर्थव्यवस्थेशी निगडित अंदाजपत्रक जास्तीत जास्त वेळा सादर करण्याचा मान त्यांना पाच वेळा मिळाला आणि याबाबत पी. चिदंबरम त्याच्यापेक्षा नशिबवान ठरले. मनमोहन सिंग यांनी पाच वेळा अर्थसंकल्प मांडला पण चिदंबरम यांना हा मान सात वेळा मिळाला. गंमतीचा भाग म्हणजे त्यांना फार कसोटीला  तोंड द्यावे लागले नाही. त्यांनी कोणाच्या तरी पूर्वपुण्याईवर  चांगली कामगिरी केली आणि स्वत:ची पाठ थोपटून घेतली. त्यांना जेव्हा अशी कामगिरी करता आली नाही तेव्हा त्यांना  हे पद सोडावे लागले. त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे दुसर्‍याच कोणाला तरी अपश्रेयाचा धनी व्हावे लागले. त्यांची खरी कसोटी लागलीच नाही. त्यांचे अपयश नेहमीच कशा ना कशाच्या खाली झाकले गेले. पण शेअर बाजारातले दलाल आणि मोठे गुंतवणूकदार चिदंबरम यांची खरी कुवत जाणून आहेत. म्हणूनच गेल्या महिन्यात चिदंबरम यांनी ज्या दिवशी आपण आता निवडणूक लढवणार नाही असे जाहीर केले तेव्हा त्याच दिवशी शेअर बाजारात मोठा निर्देशांक नोंदला गेला. आता माजी अर्थमंत्री आणि भाजपा नेते यशवंत सिन्हा यांनी गेल्या काही दहा वर्षातल्या यूपीए अाघाडीच्या आर्थिक धोरणातील दोष नेमकेपणाने पुढे आणले असून मावळते अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांना १८ प्रश्‍न विचारले आहेत. त्यातून त्यांनी पी. चिदंबरम यांचे सत्य स्वरूप पुढे आणले आहे.  यशवंत सिन्हा आणि चिदंबरम् यांच्यातील हा वाद बराचसा उद्बोधक आहे. मनमोहनसिंग सरकारच्या दोन टर्ममध्ये त्या सरकारची आर्थिक धोरणे नेमकी कोठे चुकली याचे छान मार्गदर्शन यशवंत सिन्हा यांनी केले आहे. 

पी. चिदंबरम् हे प्रथम अर्थमंत्री झाले  तेव्हा म्हणजे १९९६ साली त्यांच्या हातात मनमोहनसिंग यांनी राबवलेली आणि वळणावर आणलेली अर्थव्यवस्था आली होती. मनमोहनसिंग त्यांच्यापूर्वी नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये १९९१ ते ९६ या काळात  अर्थमंत्री होते आणि राव यांनी त्यांच्या हातून मुक्त अर्थव्यवस्था राबवली होती. मनमोहनसिंग यांनी पंतप्रधान म्हणून कमालीचे अपयशी ठरले आहेत. परंतु नरसिंहराव मंत्रिमंडळात ते उत्तम अर्थमंत्री म्हणून गाजले होते. त्यांनी ताळ्यावर आणलेली उत्तम अर्थव्यवस्था चिदंबरम् यांच्या हातात आयतीच पडली. १९९६ च्या देवेगौडा मंत्रिमंडळात आणि ९७ च्या गुजराल मंत्रिमंडळात चिदंबरम् यांनी अर्थमंत्री म्हणून काम केले. त्यांनी सादर केलेल्या बजेटचे कौतुक झाले. त्याचा मॅजिक बजेट म्हटले गेले. तेव्हाच देशाचा अर्थमंत्री म्हणून चिदंबरम् यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. 

चिदंबरम् यांचे नशीब असे की त्यांच्या हातामध्ये मनमोहनसिंग यांनी ताळ्यावर आणलेली चांगली अर्थव्यवस्था होती म्हणजे त्यांच्या मॅजिक बजेटचे श्रेय त्यांच्यापेक्षा मनमोहनसिंग यांना जास्त होते. चिदंबरम् दोनच वर्षे अर्थमंत्री राहिले. त्यामुळे त्यांना अर्थव्यवस्थेचे वाटोळे करण्याची फार संधी मिळाली  नाही. ते सलग पाच वर्षे अर्थमंत्री राहिले असते तर त्यांनी मनमोहनसिंग यांच्याकडून मिळालेल्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे करून दाखवलेच असते. नंतर चिदंबरम् २००४ साली अर्थमंत्री झाले आणि त्यांच्या हाती वाजपेयी अर्थव्यवस्था वारसा म्हणून आली होती.  वाजपेयी सरकारमध्ये यशवंत सिन्हा अर्थमंत्री होते. त्यांनी हे पद कौशल्याने सांभाळले होते, चलनवाढ मर्यादित ठेवली होती. भाववाढ होऊ दिली नव्हती आणि ८ ते ९ टक्क्यांपर्यंत अर्थव्यवस्था विकसित केली होती. सिन्हा यांच्यानंतर चिदंबरम् अर्थमंत्री झाले तेव्हा त्यांनी यशवंत सिन्हा यांचे उघडपणे कौतुक केले होते आणि चलनवाढ मर्यादेत असलेली  सदृढ अर्थव्यवस्था आपल्या हातात येत आहे असे जाहीरपणे म्हटले होते. ही अर्थव्यवस्था एवढी सदृढ होती की नंतरची पाच वर्षे म्हणजे यूपीए १ मधली पाच वर्षे तिच्या सृदृढतेच्या बळावरच चिदंबरम् यांना चांगली कामगिरी बजावता आली. म्हणजे वाजपेयी सरकारच्या पायावर चिदंबरम् यांनी चांगले काम केले. त्यांनी मनात आणले असले तरीही अर्थव्यवस्थेचे वाटोळे त्यांना करता आले नाही. चार वर्षानंतर त्यांचे नियंत्रण सुटत चालले आणि २००८ पासून महागाई प्रचंड वाढायला लागली. हे नियंत्रण सुटत असतानाच चिदंबरम् गृहमंत्री झाले आणि प्रणव मुखर्जी अर्थमंत्री झाले. 

चिदंबरम् यांनी हळूहळू बिघडवलेली अर्थव्यवस्था मुखर्जी यांच्या हातात आली आणि नंतरची तीन वर्षे सरकारची अर्थव्यवस्था दिशाहीन होऊन भरकटली. तिच्यात चिदंबरम् यांचा वाटा होता परंतु त्याचे सारे अपश्रेय मुखर्जी यांना मिळाले. प्रणव मुखर्जी राष्ट्रपती होताच चिदंबरम् पुन्हा एकदा अर्थमंत्री झाले. तेव्हा मात्र ते उघडे पडले. त्यांना अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि यूपीए २ च्या शेवटच्या तीन वर्षात अर्थव्यवस्थेचे पूर्ण अधःपतन झाले. अर्थव्यवस्था चांगली चालो की वाईट पण चिदंबरम् यांना नेहमी नशिबाने हात दिला होता  पण शेवटी शेवटी तसे झाले नाही. आता जी अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. ती पूर्णपणे चिदंबरम् यांच्यामुळे गेली आहे. त्यामुळे यशवंत सिन्हा यांनी त्यांना १८ प्रश्‍न विचारले असून चिदंबरम् यांनी जाणीवपूर्वक आणि अभ्यासपूर्वक कोणती आर्थिक धोरणे आखली आहेत असा सवाल केला आहे. चिदंबरम् यांच्या नेमक्या वर्मावर बोट ठेवले गेल्यामुळे ते चिडले असून त्यांच्यात आणि यशवंत सिन्हा यांच्यात थेट सवाल जवाब सुरू झाले आहेत.

Leave a Comment