बाळासाहेबांना सोडायची वेळ ‘त्यांच्या’मुळेच आली-राज ठाकरे

पुणे- ‘एकीसाठीच्या चर्चा वृत्तपत्र, वृत्तवाहिन्यातून होत नसतात. चर्चा करायची होती तर फोन करायचा होता’, असा राज ठाकरे यांनी नामोल्लेख न करता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. ‘मनसेला बरोबर घेऊ’च्या चर्चा कानावर येत होत्या. परंतु, जर चर्चाच करायची होती तर फोन का केला नाही? असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला. याबाबत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्याशीही भेट झाल्याचा पुर्नउच्चारही राज ठाकरे यांनी यावेळी केला. पुण्याचे मनसेचे लोकसभेचे उमेदवार दीपक पायगुडे यांच्या प्रचारार्थ डेक्कन येथील नदीपात्रात जाहीरसभा घेतली.

राज ठाकरे सभेला संबोधित करताना म्हणाले, बाळासाहेबांना सोडण्याची वेळ उद्धव ठाकरेंमुळेच आली. मात्र, बरेच झाले शिवसेना सोडली, आता असं वाटतंय. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी पवारांना का भेटतात? जर त्यांना भेटायचे आहे तर मग त्यांच्यावर टीका का करतात, असे सवाल करत राज ठाकरे यांनी मुंबईतील आरक्षित भूखंडे विकल्याचा शिवसेनेवर आरोपही केला. भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितिन गडकरींची भेट घेतलीतर काय वावगं केलं. त्यांच्या कामाचे कौतूक केले. पुणे- मुंबई एक्स्प्रेस हायवेचे स्वप्न स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिले होते. ते पूर्ण केलं ते नितीन गडकरी यांनी; असे सांगून राज ठाकरेंनी नितीन गडकरींच्या कामाचे कौतुक केले. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले पाहिजे, हे 2010 मध्ये बोललो होते. मला कुणाचे मुखवटे घेण्‍याची गरज नाही. नरेंद्र मोदी यांनी काम केले आहे तर त्यांच्या कामाची प्रशंसा केलीच पाहिजे. पंतप्रधान हा कोणत्या राज्याचा नसावा तर तो देशाचा असावा, असा सल्ला दिल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी सकाळी 11 वाजता कार्ल्यातील कुलस्वामिनी एकविरा देवीचे सपत्नीक दर्शन घेतले. एकविरा देवीच्या चैत्री यात्रेला आजपासून प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी राज ठाकरेंनी एकविरा देवीला नारळ फोडून आर्शीवाद घेतले. यावेळी राज ठाकरेंसोबत शेकापचे जयंत पाटील, मावळचे उमेदवार लक्ष्मण जगताप, रायगडचे उमेदवार रमेश कदम, मावळचे खासदार गजानन बाबर, अमेय खोपकर, बापू भेगडे आदी एकविरा देवीच्या गडावर उपस्थित होते. राज ठाकरे सोमवारी सकाळी 8 च्या सुमारास मुंबईतून पुण्याकडे निघाले. त्यानंतर मध्येच कार्ल्याच्या देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर दुपारी ते जेवणासाठी एका ठिकाणी थांबले होते. त्यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघातील स्थिती समजून घेतल्याचे सूत्रांनी माहिती दिली. यावेळी जयंत पाटील, लक्ष्मण जगताप, रमेश कदम, गजानन बाबर यांच्यासह मनसेतील काही नेते उपस्थित होते.

Leave a Comment