नव्या पतधोरणात रेपो रेटमध्ये बदल नाही

मुंबई – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या तिमाहीचे पतधोरण जाहीर केले आहे. या पतधोरणात अपेक्षेप्रमाणे रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. शिखर बँकेने आठ टक्के रेपो रेट कायम ठेवला आहे. सर्व प्रकारच्या कर्जावरील व्याजाच्या दरात कोणताही फरक पडणार नाही.

किरकोळ महागाई दरात काहीशी घट झाल्याने या पतधोरणात रेपो रेट कायम रहातील; असा अर्थतज्ज्ञांचा अंदाज होता. या पतधोरणात सीआरआरमध्येही कोणताही बदल करण्यात आलेला नाही. महागाई दर आणखी घटला तर, पुढच्या तिमाही पतधोरणात रेपो रेटमध्ये कपात होण्याची शक्यता आहे. 

रघुराम राजन यांनी गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये रिझर्व बँकेच्या गर्व्हनरपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून तीनेळा रेपो रेटमध्ये एकूण 75 अंकांची वाढ केली. सध्या सातत्याने उसळी घेत असलेल्या शेअरबाजारावरही रेपो रेट न वाढवण्याच्या निर्णयाचा सकारात्मक परिणाम दिसून येईल अशी अपेक्षा आहे.