पुणे जिल्ह्याती यंदाही आघाडीच्या उमेदवारांना संघर्ष करावा लागणार

विशेष प्रतिनिधी – पुणे जिल्हा हा काँग्रेसचा आणि आता शरद पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. असे असूनही या जिल्ह्यात गेल्या निवडणुकीत सेनेने दोन खासदार आणि  काँग्रेस – राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक खासदार निवडून आला होता. यंदा अजित पवार यांनी चारही जागा जिंकण्याची घोषणाच केली असली तरी त्यासाठी काँग्रेस – राष्ट्रवादीच्या उमेदवारांना संघर्ष करावा लागणार असल्याचे पहिल्या टप्प्यात स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यात या निवडणुकीत काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीने एकजूटीने काम करण्याचे ठरवले. तसेच काम करण्यासाठी दमदाटीही आजपर्यंत अजित पवार वारंवार करत आहेत. कधी पद न देण्याची धमकी कार्यकर्त्यांना देतात तर कधी कारवाईची धमकी देत आहेत. यातून दोन्ही काँग्रेस विजयासाठी लढत असल्याचे चित्र निर्माण कऱण्याचा हा प्रयत्न असल्याचे दिसते.

असे असले तरी पुणे शहरात काँग्रेस – राष्ट्रवादी पक्षांची यंत्रणा आणि पतंगराव कदम यांनी आणलेली खाजगी यंत्रणा यांचा ताळमेळ बसलेला नसल्याच दिसते. मावळमध्ये अपक्ष उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी दोन्ही काँग्रेसच्या तोंडचे पाणी पळवले आहे. तेथे अजूनही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जगपात यांचे काम करत तर नाहीत ना अशी धास्ती नेते मंडळींना आहे. बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघात खुद्द काका पुतण्यानेच फिजीकल संपर्क ठेवला आहे तो दगाफटका होऊ नये म्हणून. शिरूर मतदारसंघातील उमेदवार हे आंबेगाव जुन्नर वगळता सगळीकडे नविनच आहेत. त्यांच्यासाठी दिलीप वळसेपाटील यांच्यापेक्षा अजित पवार यांनीच प्रतिष्ठ पणाला लावली आहे.

त्या उलट चित्र महायुतीचे पुण्यातील अनिल शिरोळे, मावळेच श्रीरंग बारणे, शिरूरचे अढळराव पाटील यांच्याकडे असून त्यांच्या युतीतील सर्व पक्षाचे लोक एकत्रित कामाला लागले असल्याचे निदान दिसत आहे. हे तिन्ही उमेदवार काँटे की टक्कर देण्याची तयारी करत आहेत. बारामतीत यंदा आम आदमी पार्टीचे स्वच्छ चारित्र्याचे निवृत्त पोलिस अधिकारी सुरेश खोपडे यांच्या उमेदवारीमुळे रंगत निर्माण झाली आहे. खोपडे यांनी पुण्यात ग्रामीण पोलिस अधिक्षक म्हणून काम केले आहे. त्यामुळे त्यांचा चांगला परिचय ग्रामीण भागात आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेस जरी एकजूटीने कामाला लागलल्या असल्या तरी त्यांना संघर्ष करावा लागणार हे नक्की.

Leave a Comment