सांगलीत कॉंग्रेसमध्ये बंडखोरी

सांगली- सांगली लोकसभा मतदारसंघात कॉग्रेस व भाजप या दोन्ही‍ पक्षाच्या नेत्यांनी उमेदवाराविरूध्द् बंडखोरी केली होती. दोन्ही पक्षाकडून अखेरच्या क्षणापर्यंत बंडखोरी टाळण्याचे काँग्रेस नेत्यांचे प्रयत्न असफल ठरले आहेत. सांगली लोकसभेसाठी काँग्रेसचे प्रतीक पाटील यांना आता महायुतीच्या उमेदवाराबरोबरच पक्षाचे माजी आमदार हाफिज धत्तुरे यांच्याशी लढत द्यावी लागणार आहे. दुस-या बाजूला भाजपा नेत्यांनी माजी उपाध्यक्ष संगमेश तेली यांची बंडखोरी टाळण्यात यश मिळविले आहे.

या लोकसभा निवडणूक रिंगणातून काँग्रेसचे माजी आमदार हाफिज धत्तुरे यांनी माघार घ्यावी यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम क्षणापर्यंत प्रयत्न सुरू होते. पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी पुण्यातील विश्वजित कदम यांच्या प्रचाराचे काम अर्धवट सोडून सांगलीला धाव घेतली. त्यांच्यासोबत धत्तुरे यांची समजूत काढण्यासाठी आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा खास निरोप घेऊन सांगलीस आलेल्या सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा संपर्कही धत्तुरे यांनी टाळला. भ्रमणध्वनीवर ते अखेरपर्यंत संपर्क क्षेत्राच्या बाहेरच राहिले. त्यामुळे त्यांची उमेदवारी कायम राहिली.

दरम्यान, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यासोबत बैठक घेऊन आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करण्याचे आदेश दिले. राष्ट्रवादीतून दाखल झालेली उमेदवारी मागे घ्यावी यासाठी माजी महापौर मैनुद्दीन बागवान व शिक्षण मंडळाचे माजी सभापती इब्राहिम चौधरी यांना प्रयत्न करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार राष्ट्रवादीचे नगरसेवक अल्लाउद्दीन काझी, माजी नगरसेवक जमील बागवान व सज्जाद भोकरे यांनी आपले उमेदवारी अर्ज शनिवारी मागे घेतले. त्यामुळे आता आगमी काळात केंद्रीयमंत्री प्रतीक पाटील यांच्यासमोर आव्हान उभे आहे.