प्रचार मुद्यावर असावा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आजवर निवडणुकीच्या प्रचारात उडी घेतली नव्हती पण आता ते या आघाडीवर कार्यरत झाले आहेत आणि त्यांनी सुरूवातीलाच कोणावरही वैयक्तिक टीका न करता सरळ निर्विवाद विधानाने प्रचाराला सुरूवात केली. त्यांनी नरेन्द्र मोदी यांच्या गुजरात मॉडेलला हरकत घेतली. हा पॅटर्न फुसका आहे आणि त्यामुळे गुजरात हे राज्य महाराष्ट्राच्या पुढे गेलेले नाही उलट महाराष्ट्रच आघाडीवर आहे असा दावा त्यांनी केला. एवढेच नाही तर आपण या बाबतीत मोदी यांच्याशी थेट चर्चा करायला तयार आहोत असे त्यांनी आव्हान दिले. या आव्हानातून त्यांचा आत्मविश्‍वास तर प्रकट झाला आहेच पण त्याने निवडणूक प्रचाराचा दर्जा उंचावायला मदत झाली. शेवटी कोणताही नेता आपल्या व्यक्तिमत्त्वानुसारच बोलत असतो. खरे तर आपण आपली लोकशाही फार परिपक्व होत असल्याचा दावा करीत असतो पण तो परिपक्वपणा निवडणुकीच्या प्रचारात दिसायला हवा आहे. तसा तो दिसत नव्हता पण मुख्यमंत्र्यांनी तो वाढवला आहे.  गेल्या काही दिवसांपासून तो दिसत नव्हता. प्रचार सभांत शिविगाळ, खोटे आरोप, वैयक्तिक टीका यांचाच भडिमार होत होता.  संयमी म्हणून ओळखले जाणारे नेतेही असंबद्ध भाषणे करायला लागले होते. त्यामुळे निवडणुकीच्या दर्जावर  प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. 

या गोष्टी लोकांना आवडत नाहीत याची जाणीव आता सर्वच नेत्यांना व्हायला लागली आहे की काय हे माहीत नाही पण सगळेच नेते गेल्या दोनच दिवसात  थोडे मुद्यावर बोलायला लागले आहेत. निवडणुकीच्या मैदानात   विविध पक्षांनी आपली धोरणे, आपल्या हातात जिथे सत्ता होती तिथला आपला कारभार या गोष्टींची चर्चा करणे अपेक्षित आहे. शेवटी कोणत्या पक्षाचे लोक अधिकाधिक कोट्या करतात आणि विरोधकांवर आक्रमक शब्दांत तोंडसुख घेतात त्यांना मते दिली पाहिजे असा काही लोकांचा दृष्टिकोन नसतो. यातले काही उमेदवार तर स्वतःला जनतेचे सेवक म्हणवतात किंवा महाराष्ट्रात काही उमेदवार स्वतःला जनतेचा सालगडी म्हणवून घेतात. कोणत्याही मालकाला आपला सालगडी हा जोकर असावा असे वाटते. छान शिव्या देणारा माणूस हा आवर्जुन नोकरीला ठेवावा असा कोणता तरी मालक विचार करील का? जनता असाच विचार करते. देशाच्या विकासाचा कार्यक्रम, लोकांच्या कल्याणाचा कार्यक्रम जो उमेदवार गांभिर्याने मांडेल त्यालाच आपला आमदार, खासदार करावे असे लोकांना वाटते. म्हणून सत्ताधारी पक्षाने आपण काय केलेले आहे हे जनतेसमोर मांडावे अशी जनतेची अपेक्षा असते. 

पंतप्रधान मनमोहनसिंग सध्या प्रचारसभांमध्ये फारसे  आक्रमकपणे सहभागी झालेले नाहीत. परंतु त्यांनी आसाममध्ये घेतलेल्या दोन सभांमध्ये आपल्या सरकारने दहा वर्षात केलेल्या कामांकडे पाहून जनतेने आपल्याला मते द्यावीत असे आवाहन केले आहे. सत्ताधारी पक्षाची प्रचाराची लाईन हीच असावी परंतु कॉंग्रेसला ती महागात पडणारी आहे. कारण गेल्या दहा वर्षातला कॉंग्रेसचा कारभार फारसा चांगला राहिलेला नाही. खरे म्हणजे मतदारांच्या सर्वेक्षणांमधून जे काही दिसून येत आहे त्यातही या सरकारच्या कारभाराचीच नाराजी प्रकट होत आहे. सरकार  आपण केलेल्या कामगिरीचा आढावा घेऊन जनतेसमोर जे काही मांडत आहे ते कसे चुकीचे आहे हे सांगण्याचे काम विरोधी पक्षांचे आहे. त्यामुळे विरोधी पक्षानेसुध्दा महागाई आणि भ्रष्टाचार या दोन दोषांवर भरपूर लक्ष दिलेले दिसत आहे. हळूहळू हेच मुद्दे समोर आले पाहिजेत आणि त्या मुद्यांवरूनच कॉंग्रेसच्या पदरात मतदारांनी माप टाकले पाहिजे.  भारतीय जनता पार्टी हा पक्ष विरोधी पक्ष म्हणून आज समोर उभा असला तरी १९७७ पूर्वी हा पक्ष जसा विरोधी पक्ष होता तसा तो राहिलेला नाही. ७७ पूर्वी या पक्षाच्या हातात कधीच सत्ता आली नव्हती. गेली ६५ वर्षे कॉंग्रेसच्या हाती सत्ता आहे असे म्हटले जात असले तरी भारतामध्ये या ६५ पैकी १२ वर्षे कॉंग्रेसच्या हाती सत्ता नव्हती. 

मग या बारा वर्षामध्ये भाजपा आणि अन्य विरोधी पक्षांनी काय केले हेही सांगणे हे त्यांचे कर्तव्य आहे. विशेषतः भारतीय जनता पार्टी, समाजवादी पार्टी, जनता दलाचे विविध गट यांच्या हातात कधी ना कधी राज्या राज्यातली सत्ता आलेली आहे. मग या पक्षांच्या कारभारात आणि कॉंग्रेसच्या कारभारात नेमका काय फरक होता आणि या पक्षांचा कारभार कॉंग्रेस पेक्षा वेगळा कसा होता हे सांगणे हे या विरोधी पक्षांचे कर्तव्य आहे. कारभाराविषयी चर्चा करताना विरोधी पक्षांच्या हातात सांगण्यासारखे बरेच काही आहे मात्र त्यांनी निव्वळ कॉंग्रेसला विरोध न करता आपली सकारात्मक बाजूसुध्दा जनतेसमोर मांडली पाहिजे. असा विचार सर्वांनीच केला तर निवडणुकीच्या माध्यमातून निदान या पक्षांच्या कारभाराच्या संदर्भात तरी जनतेचे प्रबोधन होण्याची शक्यता आहे आणि हे सारे प्रबोधन प्रामुख्याने जाहीर सभांमधून होत असते. ते चांगले व्हावे यासाठी विविध पक्षांच्या नेत्यांकडे चांगले वक्तृत्वाचे कौशल्य हवे आणि श्रोत्यांचीसुध्दा तेवढी वैचारिक तयारी असायला हवी. पण आता तरी निदान आपल्या पक्षाने केलेले काम, दुसर्‍या पक्षाने न केलेले काम आणि आपण करणार असलेले काम या पातळीवर तरी प्रचार आलेला आहे. ही समाधानाची बाब आहे.

Leave a Comment