अखेर, मोदींना बाळासाहेब आठवले!

अमरावती – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात अनेक सभा घेणारे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना अखेर आज अमरावतीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाली. किंबहुना, बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली वाहण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाडाव करा, असं आवाहन करतच त्यांनी मतदारराजाकडे मतांचा जोगवा मागितला. शिवसेनेचे अमरावतीचे उमेदवार खासदार आनंदराव अडसूळ यांच्यासाठी मोदींनी घेतलेली सभा आणि त्यात बाळासाहेबांचा केलेला नामोल्लेख, यातून महायुतीतील ऐक्याचं दर्शन घडल्यानं शिवसेना आनंदली आहे. 

भाजपनं पंतप्रधानपदाची उमेदवारी दिल्यापासून आजपर्यंत नरेंद्र मोदींनी मुंबईसह महाराष्ट्रात ब-याच सभा घेतल्या. या सभांमध्ये त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका केली, यूपीए सरकावर हल्ला चढवला, गुजरातच्या विकासाचे दाखले देऊन मतदारांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केला. परंतु, यापैकी कुठल्याही भाषणात त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव न घेतल्यानं शिवसैनिकांची मनं दुखावली गेली होती. सेनानेत्यांनी आपली ही नाराजी उघडपणे बोलून दाखवली नव्हती, पण सैनिकांमध्ये थोडा असंतोष होताच. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र, बाळासाहेबांचा नामोल्लेख टाळणा-या मोदींवरचा आपला राग जाहीरपणे व्यक्त केला होता. 

शिवसेना-मनसेची ही नाराजी अखेर मोदींनी दूर केली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींची जाहीर सभा झाली. त्यात मोदींनी बाळासाहेबांबद्दल आदराची भावना व्यक्त केली. आपल्या प्रत्येकाच्याच हृदयात बाळासाहेबांचं स्थान अढळ आहे. काँग्रेसमुक्त महाराष्ट्र आणि भारताचं त्यांचं स्वप्न साकार करणं, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरू शकेल. त्यामुळे येत्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या एकाही उमेदवाराला विजयी करू नका, असं आवाहन मोदींनी केलं. तेव्हा शिवसैनिकांनी बाळासाहेबांना घोषणांची दणदणीत सलामी दिली. 

देशाचे कृषिमंत्री महाराष्ट्रातले असूनही इथले शेतक-यांना आत्महत्या करावी लागते, हे दुर्दैवी आहे. शरद पवारांकडे क्रिकेटवर बोलण्यासाठी वेळ आहे पण शेतक-यांना वाचवण्यासाठी नाही, अशी सणसणीत टीका नरेंद्र मोदींनी केली. एलबीटी म्हणजे ‘लुटो बाटो टॅक्स’ असल्याची टिप्पणी करून हा कर शेतक-यांचे हाल बेहाल करतोय, असं त्यांनी नमूद केलं. गरिबी काय असते, हे काँग्रेस नेत्यांना ठाऊक नाही. थंडीत उघड्यावर झोपणं काय असतं, हे काँग्रेसच्या शहजाद्याला, राहुल गांधींना माहीत आहे का?, असा सवालही मोदींनी केला. आदर्श आणि राष्ट्रकुल घोटाळ्यांनी देशाला लुटल्याची टीकाही त्यांनी केली. १६ मे रोजी देशात भाजपची सत्ता येईल आणि नंतर सर्वत्र सुशासन स्थापन होईल, अशी विश्वासही मोदींनी व्यक्त केला.

Leave a Comment