कॉंग्रेसलाच चढलाय मोदी फिव्हर

मोदींनी भारताचा झंझावाती दौरा केला आहे. आज तरी या देशात एवढा प्रभावी दौरा करणारा दुसरा कोणी नेता नाही. त्यांच्यामुळे भाजपाला अनुकूल वातावरण तयार झाले आहे ही गोष्ट निष्पक्षपाती राजकीय निरीक्षकही मानत आहेत. जागोजागा त्यांच्या मोठाल्या सभा होत आहेत पण महाराष्ट्रातले काही नेते मोदींची लाट वगैरे काही नाही अशी खात्री देत आहेत. लाट असो की नसो आपल्याला त्याची चिंता करण्याचे काही कारण नाही पण शरद पवार यांनी गेल्या काही दिवसात महाराष्ट्राच्या बाहेर पायही ठेवलेला नाही. त्यांना इतर राज्यात कसे वातावरण आहे याची काहीही कल्पना नाही. तशी ती असण्याची शक्यताही नाही पण ते मोदी लाट नाही असे आवर्जुन तसेच गरज नसताना सांगत आहेत आणि त्यांच्या अशा  चर्चेनेच मोदी लाट निर्माण होत आहे. आजच नेल्सन कंपनीने सर्वेक्षण घेतले असून त्यात असे दिसून आले आहे की, भाजपाला महाराष्ट्रात १९ जागा मिळतील तर शिवसेनेला १२ जागा मिळतील. कॉंग्रेसला या सर्वेक्षणात आठ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त झाली आहे तर राष्ट्रवादीला पाच जागांवर समाधान मानावे लागणार आहे. महाराष्ट्र हे काही भाजपाचा बालेकिल्ला म्हणावा असे राज्य नाही पण येथे भाजपाला १९ जागा मिळण्याची शक्यता दिसत आहे ती मोदी लाटेमुळेच आहे.

उत्तर प्रदेशात इमरान मसूद या एका वेड्या माणसाने मोदींचे तुकडे तुकडे करण्याची जाहीर प्रतिज्ञा केली. हा माणूस कोणी सामान्य माणूस नाही. तो कॉंग्रेसचा सहरानपूर मतदारसंघातला उमेदवार आहे. त्यांने आपल्या भाषणात अजूनही बरीच अक्कल पाजळली पण  त्यावर कॉंग्रेसने काही कारवाई केली नाही. कॉंग्रेसचे नेते अनियंत्रित झाले आहेत, त्यांना काही शिस्त नाही, ते बरळत सुटले आहेत आणि पक्ष त्यांच्यावर काहीही कारवाई करीत नाही. अशा प्रलापांनी मुस्लिम मतदार खुष होऊन कॉंगे्रसच्या मागे उभा राहील असे त्यांना वाटत असेल पण कदाचित मुस्लिम  खुष झाले तरीही बाकीचे हिंदू त्याच प्रमाणात नरेन्द्र मोदी यांचे समर्थक होऊन त्यांच्या मागे उभे राहू शकतात. त्यांना हे सांगणार तरी कोण? कॉंग्रेस पक्षाचा अशा लोकांवर वचक नाही. कारण उत्तर प्रदेशात कॉंग्रेसला उमेदवार मिळत नव्हते. हा समाजवादी पार्टीतला आयात केलेला उमेदवार आहे. अशा लोकांच्या या अज्ञानाने गेल्या काही दिवसांपासून नरेन्द्र मोदी हा राजकारणाचा केन्द्रबिंदू झाला आहे. त्यांनी सारा भारत ज्या झंझावाताप्रमाणे ढवळून काढला आहे. 

मात्र त्यांच्या विरोधकांची एवढा जळफळाट होत आहे की ते आपल्या भाषणात दुसरे काही बोलण्याऐवजी मोदींवर टीका करण्यातच  वेळ घालवायला लागले आहेत.  देशात  मोदी लाट आहे की नाही हे आता कळणार नाही. १६ मे नंतर कळणार आहे पण ती असेलच आणि तिने भाजपाला निवडणुकीत चांगले यश मिळवून दिलेच तर ती लाट मोदींच्या विरोधकांनीच निर्माण केलीय असे म्हणावे लागेल. इतके त्यांचे विरोधक ठायी ठायी त्यांच्या नावाचा म्हणजे नमो नमोचा जप करायला लागले आहेत. शरद पवार यांना तर मोदींच्या प्रभावाने इतका ठसका लागला आहे की, ते मोदींचा विरोध करण्यासाठी काहीही अतर्क्य बोलायला लागले आहेत. मोदी उतावळे झाले आहेत असा पवारांचा आरोप आहे पण उतावळे झाले आहेत म्हणजे काय करीत आहेत ? त्यांनी काही पंतप्रधान म्हणून स्वत:ला जाहीर केलेले नाही. ते तर उमेदवार आहेत. अशी उमेदवारी जाहीर करण्याची काही पहिली वेळ नाही. अनेकदा हा प्रकार घडला आहे. आज राहुल गांधी यांचे नाव तसे जाहीर केले तर कॉंग्रेसला आहेत तीही मते मिळणार नाहीत हे कॉंग्रेसच्या नेत्यांना माहीत आहे म्हणून ते त्यांचे नाव जाहीर करीत नाहीत पण राहुल गांधी हा त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार आहे.

पवार आता  गुजरात पॅटर्नवरही तुटून पडले आहेत. महाराष्ट्राचा पॅटर्न त्यापेक्षा चांगला आहे असे पवारांचे म्हणणे आहे. पण महाराष्ट्राच्या पॅटर्नवर पवारांनीच मागे एकदा संताप व्यक्त केला होता. साखर कारखान्यांची दिवाळखोरी हाच महाराष्ट्राचा पॅटर्न आहे. पवारांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हाताला कोणत्याही आदेशावर स्वाक्षरी करताना कसा लकवा होतो हे मागे सांगितले होते. हाच तो महाराष्ट्राचा पॅटर्न आहे. गेल्या पंधरा दिवसात महाराष्ट्रात ८० शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. हाच महाराष्ट्राचा पॅटर्न आहे.  महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या या दोन पक्षांच्या मंत्र्यांनी  गेल्या पाच वर्षात आणि विशेषत: पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यापासून परस्परांच्या विरोधात केलेली विधाने एकाखाली एक नुसती लिहून काढली तरी महाराष्ट्राच्या पॅटर्नवर चांगलाच प्रकाश पडेल. प्रत्यक्षात प्रकटपणे न बोलता या दोन पक्षांनी परस्परांचे पाय ओढण्यासाठी केलेल्या छुप्या कारवायांचा आढावा घेतला तरीही महाराष्ट्रात त्यांनी कोणता पॅटर्न राबवला आहे याचे दर्शन घडते.

Leave a Comment