मुख्यमंत्री करत आहेत मोदींचा प्रचार !

मुबई-  केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री पथ्वीराज चव्हाण यानी सुरूवातीपासून भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर टीकाटिप्पणी करण्यातच भाषणातील अर्धाअधिक वेळ खर्च करत आहेत. त्यामुळे सभेत किंवा मेळाव्यात सतत मोदींचे नाव घेत असल्याने ते मोदींचा प्रचार करत नाही ना अशी शंका राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते विचारू लागले आहेत.

निवडणुकीच्या मेळाव्यांपासून ते जाहीर सभांपर्यंत सर्व ठिकाणी शऱद पवार यांनी नरेंद्र मोदी हे कसे फॅसिस्ट आहेत हे ठसवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याच बरोबर पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करण्याच्या विषयावरही ते टीका करताना पुन्हा मोदींचे नाव घेतात. मोदींनी गुजरातमध्ये काय केले हे सांगण्याचा किंवा तेथील मोदींच्या भ्रष्ट कारभारावद्दल आतापर्यंत पवार किंवा मुख्यमत्री कधीच बोलले नाहीत.

त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे मोदींना प्रत्यक्ष चर्चेचे आव्हान वारंवार देत आहेत. केद्र सरकारने गरीबांकरिता अन्न सुरक्षा आणली, गरीब, मुस्लिम, मागासवर्गियांबद्दल घेतलेले कल्याणकारी निर्णय सांगण्याचा प्रयत्नही करताना ते दोघेजण दिसत नाहीत. त्यात काल काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला त्यावर मुख्यमत्री बोललेले नाहीत. या निवडणुकीत कोणताही भावनिक मुद्दा शरद पवारांकडे नाही. त्यामुळे त्यांची भाषणात चांगलीच गैरसोय होताना दिसत आहे. तसेच विरोधकांच्या बाबतीतही बोलण्यासारखे मुद्दे त्यांच्याकडे नसल्याने ते सतत मोदींचे नाव घेत टीका करत आहेत.

या दोन्ही नेत्यांच्या टीकेच किंचितही दखल मोदी यानी घेतली नाही. तसेच त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर न देण्याचा राजकीय शहाणपणा मोदींनी दाखवला आहे. निवडणूक प्रचाराच्या सुरूवातीलाच आघाडीच्या प्रमुख नेत्यांची अशी बिकट परिस्थिती झालेली दिसते. त्यांच्या या मोदींच्या प्रचारामुळेच पवारांच्या सभेला लोकांचा थंड प्रतिसाद पुणे, नवीमुंबई, डोंबिवलीत मिळाल्याचे दिसले. तसेच विदर्भाची निवडणूक अगोदर असतानाही पवार हे तेथे प्रचार न करता पश्चिम महाराष्ट्रात करत असलेल्या प्रचाराबद्दल आश्चर्य व्यक्त करत आहेत. एरवी मिडियाबद्दल न बोलणारे पवार मोदींची भाषणे चॅनेल्सनी दाखवणे आणि पंतप्रधानांची न दाखवणे याबद्दलही टिप्पणी सभेत करू लागले आहेत.