औरंगाबाद: पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्ब स्फोटातील दोषी असलेला दहशतवादी मिर्झा हिमायत बेग याला औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून बहुजन मुक्ती पक्षाने उमेदवारी बहाल केली आहे. बेग याच्यावर महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद प्रतिबंधक पथकाने खोटे आरोप लावले असून राष्ट्रीय तपास यंत्रणा, दिल्ली पोलीस आणि बंग़ळुरू पोलिसांनी बेग याला क्लीन चिट दिल्याचे पक्षाचे राष्ट्रीय सचिव राहुल मखरे यांनी सांगितले.
मिर्झा हिमायत बेग याला जर्मन बेकरी बॉम्ब स्फोटात पुणे सत्र न्यायालयाने दोषी ठरविले असून या निकालाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली आहे.
पक्षाला राज्यातच नव्हे; तर देशभरातील अल्पसंख्य आनि मागास समाजातून मोठा प्रतिसाद मिळत असून कामगार वर्गाचाही पाठींबा मिळत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत पक्ष देशभरात 400 जागांवर आपले उमेदवार उभे करणार असून त्यात महाराष्ट्रातील 48 जागांचाही समावेश असल्याचे मखरे यांनी सांगितले.
देशभरात अल्पसंख्य समाजातील 52 हजार युवकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोपही मखरे यांनी केला. निवडणुकीच्या प्रचारासाठी बेग याला जामीन मिळावा; यासाठी बहुजन मुक्ती पक्षाने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व्ही एल मलंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू राजरत्न आंबेडकर हे बेगच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.