उस्मानाबाद मतदारसंघात बंडखोरीने रंगत

उस्मानाबाद मतदारसंघ हा एरवी लक्षवेधी ठरला नसता, परंतु अण्णा हजारे यांच्या दौर्‍यामुळे सर्वांचे लक्ष या मतदारसंघाकडे वेधले गेले आहे. अण्णा हजारे या मतदारसंघात दौर्‍याला येणार आहेत. कारण तिथे त्यांच्या खुनाची सुपारी देणारे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकिटावर उभे आहेत. अण्णा हजारे यांनी या लोकसभा निवडणुकीत फार दौरे काढले नाहीत, परंतु ते उस्मानाबादला मात्र आवर्जून येणार आहेत कारण त्यांना पद्मसिंह पाटलांविरुद्ध प्रचार करायचा आहे. पद्मसिंह पाटील यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी पवनराजे निंबाळकर यांचा खून केला असल्याचा आरोप आहे आणि सीबीआयच्या तपासात तसे निष्पन्न होऊन त्यांच्यावर खटलाही भरला गेलेला आहे. तूर्तास ते जामीनावर बाहेर आलेले आहेत. मात्र शरद पवार यांनी अशा बदनाम व्यक्तीला उस्मानाबादची उमेदवारी दिलेली आहे. 

शरद पवार हे अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गुंडांना नेहमीच पाठीशी घालतात असा अण्णांचा आरोप आहे. आपण एवढी हिंमत करून पद्मसिंह पाटील यांचा गुन्हेगारी चेहरा जगासमोर आणला पण तरी सुद्धा पवारांनी त्यांनाच उमेदवारी दिली. एवढ्यावरही आपण गप्प बसलो तर ते योग्य ठरणार नाही. म्हणून अण्णा उस्मानाबाद मतदारसंघात प्रचाराला येणार आहेत. डॉ. पद्मसिंह पाटील यांनी त्यांचा एकेरी शब्दात उल्लेख करीत त्यांना आव्हान दिले आहे आणि अण्णांनी ते स्वीकारले आहे. अण्णा आणि पद्मसिंह पाटील यांच्यातील आव्हान-प्रतिआव्हानामुळे या मतदार संघातील लढत रंगात येत असतानाच या लढतीतली रंगत भारतीय जनता पार्टीतल्या बंडखोरीने वाढली आहे. 

या मतदारसंघात २००९ च्या लोकसभा निवडणुकीत पद्मसिंह पाटील यांच्याशी माजी आमदार प्रा. रविंद्र गायकवाड यांनी जोरदार टक्कर दिली होती. त्यावेळी पद्मसिंह पाटील केवळ ६०० मतांनी विजयी झाले होते. आताच्या सध्याच्या वातावरणात या दोघांची लढत पुन्हा रंगली तर ही जागा शिवसेनेला मिळू शकते असे वातावरण असतानाच भारतीय जनता पार्टीचे रोहन सुभाष देशमुख बंडखोरी करून उभे राहिले आहेत. या दोघांच्या लढतीमध्ये पद्मसिंह पाटील यांचा विजय सोपा होत चालला आहे. 

श्री. रोहन देशमुख यांच्या बंडखोरीमागे सुद्धा एक इतिहास आहे. रोहन देशमुख यांचे वडील सुभाष देशमुख हे भाजपाचे माजी खासदार आहेत. ते सोलापूर मतदारसंघातून २००४ च्या लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नी उज्वला शिंदे यांचा पराभव करून निवडून आले होते. मात्र त्यानंतर त्यांना माढा मतदारसंघात उभे करण्यात आले, पण ते पराभूत झाले. कारण तिथे त्यांना शरद पवार यांच्याशी टक्कर द्यावी लागली. आता आपल्याला पुन्हा माढ्यात उभे करावे अशी त्यांची मागणी होती. परंतु माढा मतदारसंघ स्वाभीमानी शेतकरी संघटनेला सोडण्यात आला. त्यामुळे सुभाष देशमुख नाराज झाले. ही नाराजी प्रगट करण्यासाठी त्यांनी उस्मानाबादेत आपल्या मुलाला अपक्ष म्हणून उभे केले आहे. 

रोहन देशमुख यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात एक साखर कारखाना काढला आहे आणि त्यांच्या लोकमंगल उद्योग समुहाच्या वतीने लोकांची बरीच कामे केली आहेत. त्यामुळे आपण निवडून येणार असा विश्‍वास त्यांना वाटत आहे. रोहन देशमुख यांच्या उमेदवारीमुळे भाजपा-सेना युतीची मते फुटतील हा युक्तीवाद त्यांना मान्य नाही. कारण या मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच काही नेते रोहन देशमुख यांच्या मागे उभे रहात आहेत.

Leave a Comment