भारत जातीयता मुक्‍त करण्यासाठी भाजपला बाजूला ठेवा – कृषीमंत्री शरद पवार

पुणे, – जातीयता मुक्‍त भारत करायचा आहे. त्यासाठी मोदी व त्यासारख्या प्रवृत्तींना खड्यासारखे बाजूला ठेवा, असा भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्ला चढवत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी देशाचे एकसंधत्व कायम ठेवण्यासाठी कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहनही पवार यांनी आज येथे केले.

कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्ह्यातील उमेदवार विश्‍वजीत कदम (पुणे), खासदार सुप्रिया सुळे (बारामती), राहुल नॉर्वेकर (मावळ) आणि देवदत्त निकम (मावळ) यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले. यानंतर बी.जे. महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित सभेमध्ये या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडताना शरद पवार यांच्यासह सर्वच नेत्यांनी भाजप- शिवसेना – रिपाइं महायुतीवर शाब्दिक हल्ला चढविला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, कॉंग्रेसचे प्रदेशअध्यक्ष माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशअध्यक्ष भास्कर जाधव, विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे – पाटील, राज्यातील मंत्री डॉ. पतंगराव कदम, जयंतराव पाटील, हर्षवर्धन पाटील, नितीन राउत, प्रा. जोगेंद्र कवाडे, खासदार रजनी पाटील, ऍड. वंदना चव्हाण यांच्यासह कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे सर्व आमदार, पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

पवार म्हणाले, की केंद्र आणि राज्यातील आघाडी सरकारने अनेक लोकोपयोगी योजना राबविल्या आहेत. याचा लाभ थेट सर्वसामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना झाला आहे. अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वंयपुर्ण असून मोठ्याप्रमाणात निर्यातही करण्यात येत आहे. दीडशे वर्षांचा इतिहास असलेल्या कॉंग्रेसने देशाचे सार्वभौमत्व टीकवून ठेवण्यात नेहमीच महत्वाची भूमिका ठेवली आहे. तर दुसरीकडे ज्याला देशाचा इतिहास आणि भूगोल माहिती नाही, अशी व्यक्‍ती देशाचा पंतप्रधान व्हायला निघाली आहे. खासदारांचे कुठलेही पाठबळ नसताना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून वावरणारी पहिलीच व्यक्‍ती आपण पाहीली आहे, अशी उपरोधीक टीका मोदी यांच्यावर केली. आम्हाला देशात जातीय दरी निर्माण करणारी व्यक्‍ती नको, देशाचा एकसंध विचार करणारी व्यक्‍ती हवी, असा टोलाही त्यांनी मोदी यांना लगावला.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालीच देशाची प्रगती झाली आहे. केंद्रातील सरकारने केलेल्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा, अन्य काही करण्याची गरज नाही. मोदींची हुकूमशाही देशाला मानवणारी नाही, ही व्यक्‍ती सत्तेत आल्यास सर्वप्रथम सर्वसामान्य जनतेनी उभारलेली सहकार चळवळ मोडीत काढतील. संपुर्ण देशात जीएसटी ही एकच करप्रणाली लागू करण्याच्या उद्देशाने एलबीटी सुरू करण्यात आली आहे. परंतू भाजपची सत्ता असलेली राज्य जीएसटीला विरोध करत असल्याचे चव्हाण यांनी यावेळी नमूद केले.

जिल्ह्याचा औद्योगीक विकास होत असताना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ निर्माण होत आहे. भावी पिढीच्यादृष्टीने आंतरराष्ट्रीय विमानतळाची नितांत आवश्‍यक्‍ता आहे. रस्ते, धरणे बांधताना भूसंपादन हे गरजेच आहे, यासाठी भविष्यात विमानतळासाठीही भूसंपादन करावे लागणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नमूद केले. स्थानीक स्वराज्य संस्थेत एकमेकांविरोधात निवडणुका लढलो, हा इतिहास झाला आहे. झाले गेले विसरून सोनीया गांधींचे हात बळकट करण्यासाठी आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन पवार यांनी केले. तर भास्करराव जाधव आणि माणिकराव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार हा आपलाच आहे, असे समजून राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रचार करावा, असे आवाहन केले. जाधव यांनी यावेळी शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व कमकुवत असल्याचा पुनरूच्चार केला.

प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी यावेळी रिपाइंनेते खासदार रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकरांवर जोरदार टीका करताना त्यांनी जातीयवादी पक्षांची कास धरल्याचा आरोप केला. मोदींचे सरकार आल्यास जनतेला तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार सोसावा लागेल. त्यामुळे अब की बार मोदी सरकार नव्हे तर अब की बार जनता सरकारचा नारा देत आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.

नॉर्वेकरांसाठी शरद पवार, सुळे दक्ष
मावळ मतदारसंघातील उमेदवार राहुल नॉर्वेकर हे माझे मेव्हुणे आहेत. त्यांना निवडुण आणण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. नाही तर माझी बहीण नाराज होईल, अशी भावना खासदार सुप्रिया सुळे यांनी सभेत व्यक्‍त केली. तर शरद पवार यांनीही मावळमधील सर्व उमेदवारांच्या टीव्ही चॅनेलवर समोरासमोर मुलाखती घ्या. संसदेत गेल्यावर हिंदी, इंग्रजीतून बोलावे लागते, सर्वजण कसे उघडे पडतात ते पहा, अशी टीका विरोधी पक्षाच्या उमेदवारांवर करत नॉर्वेकर यांच्या दोन्ही भाषेतील आणि राष्ट्रीय स्तरावरील विषयांतील ज्ञानाचे पवार यांनी कौतुक केले.

Leave a Comment