गौप्यस्फोट झाला फुसका

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेला खिजवण्यासाठी एक गौप्यस्फोट केला पण त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी महागौप्यस्फोट केला. दोन्ही स्फोट तसे फुसकेच होते तरीही त्यांच्यामुळे निवडणुकीत थोडी का होईना रंगत आली. दिवाळीत मुले शोभेचे दारूकाम करतात. फटाक्यांच्या आवाजाने त्यांची करमणूक होते हे खरे आहे पण एखादा फटाका फुसका निघाला तरी ती मुले तो फुसक्या बारचाही आनंद लुटतात. तसे अजितदादांचा पूर्ण फुसका आणि उद्धवजींचा निमफुसका बारही मजा देऊन गेला. तसे अजित पवार नेहमीच आपल्या खिशात अनेक गुपिते असल्याचा दावा करीत असतात. आपल्याजवळचे गुपित सांगितले तर तुम्हाला जगणे मुश्कील होईल, राजकारण करणे कठीण होऊन बसेल, तुम्हाला रस्त्यावरून चालणे अशक्य होऊन बसेल किंवा तुमच्या झोपा उडतील अशा शेलक्या शब्दात लोकांना धमकी देत ते आपल्या जवळच्या गुपितांचा वापर करत असतात. त्यांच्याजवळचे ते रहस्य नेमके काय असते हे त्यांनाच माहीत, पण त्याच्या आधारावर ते देतात त्या धमक्या मात्र मोठ्या असतात. त्यांनी नुकतेच ठाण्यात झालेल्या जाहीर सभेत आपल्या खिशातल्या गुपितांच्या गौप्यस्फोटाचा पहिला हप्ता बाहेर काढला. 

ठिकाण ठाणे असल्यामुळे या गौप्यस्फोटासाठी त्यांनी ठाण्यातली शिवसेनेची गुपिते वापरली. ठाण्याचे शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे हे आपल्या संपर्कात होते आणि चार-पाच आमदारांसह राष्ट्रवादीमध्ये यायला तयार होते, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. आता महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा, मनसे आणि कॉंग्रेस या पाचही पक्षांमध्ये एवढी पक्षांतरे माजली आहेत की, कोणीतरी एखादा पक्ष सोडून दुसर्‍या पक्षात येऊ म्हटले तर ती काही फार मोठी गुपिताची गोष्ट ठरत नाही. तेव्हा अजित पवार यांनी थांबून थांबून ठाण्यात जो गौप्यस्फोट केला तो फुसका बार होता. आता त्याच्यामुळे कोणाची झोप उडाली हे अजित पवारांनाच माहीत. एकनाथ शिंदे जर एवढ्या जाम्यानिम्या सहित राष्ट्रवादीत यायला निघालेच होते तर मग राष्ट्रवादीने त्यांना आत का घेतले नाही? नाही तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व कमी झालेले आहे. जास्तीत जास्त सात खासदार निवडून येतील एवढेच बळ उरले आहे. अशा अवस्थेत एक शिवसेनेचा आमदार चार-पाच जणांना घेऊन येत असेल तर त्याला राष्ट्रवादीने आत घ्यायला पाहिजे होते. मात्र तसे का केले नाही हे एक गुपितच आहे. आता या गुपिताचा स्फोट केल्यामुळे कोणाची झोप उडणार आहे हे अजित पवारांनाच माहीत आहे.

अजित पवार यांची अशी खूप गुपिते आहेत जी जाहीर केली तर सगळ्यांचीच झोप उडणार आहे. सोलापूर जिल्ह्यातला माढा मतदारसंघ हा शरद पवारांनी जिंकलेला मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघात आता राज्याचे उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभे आहेत. त्यांना या मतदारसंघात महायुतीच्या सदुभाऊ खोत यांनी मोठे जेरीस आणले आहे. परंतु मोहिते-पाटलांचे बंधू प्रतापसिंह मोहिते-पाटील हेही अपक्ष म्हणून उभे असून आपल्या ज्येष्ठ बंधूच्या पराभवासाठी कटीबद्ध झाले आहेत. या प्रतापसिंह मोहिते पाटलांना सारा चंदीचारा आणि कुमक कोण पुरवत आहे, विजयसिंह मोहिते पाटलांचा विधानसभा निवडणुकीत पराभव करणार्‍या भारत भालके यांना कोणी रसद पुरवली होती हे गुपित अजित पवार सोडून सर्वांना माहीत आहे. अजित पवारांना ते माहीत नाही, कारण ते डोळे झाकून दूध पीत आहेत. माढ्यामध्ये विजयसिंह मोहिते-पाटील खरोखर विजयी झाले तर अजित पवारांची झोप कशी उडणार आहे हे नंतर कळणारच आहे. मात्र अजित दादांनी ठाण्याच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांची झोप उडविण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या आपल्याशी सुरू असलेल्या गुप्तगूचा गौप्यस्फोट केला होता. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये राहून दुसर्‍याच्या पक्षांतराची चर्चा करणे हे आपल्याला फारसे परवडणार नाही हे अजित पवारांना कळले नाही. 

परिणामी, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पदरात चांगलेच माप टाकले. आमचा एक आमदार तुमच्या संपर्कात राहतो हा गौप्यस्फोट आमची झोप उडवणारा आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही भ्रमात आहात. आमचा एकच आमदार तुमच्या संपर्कात आहे, पण तुमचे सर्वेसर्वा असलेले ज्येष्ठ नेते हेच भाजपाच्या आणि रालो आघाडीच्या संपर्कात आहेत हे तुम्हाला माहीत नाही आणि पवार कोणाकोणाच्या संपर्कात असतात हे सर्वांनाच माहीत आहे. आपण कायम कोणत्याही पक्षाशी युती करायला तयार असलेल्या काकांचे पुतणे आहोत याचा विसर अजित पवारांना पडला आणि ते नको त्या गोष्टीचा गौप्यस्फोट करायला निघाले. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पदरात चांगलेच माप टाकले आहे. अजित पवारांना आपण फार सडेतोड, परखड, सत्य आणि लोकांना न मानवणारे, न पचणारे असे काही तरी बाळगून असतो याचा फार मोठा गर्व आहे. पण या गर्वाचा ताठा कधी कधी उतरतो, तसा तो आता त्यांच्या इतरांची झोप उडविणार्‍या कथित गौप्यस्फोटाने उतरला आहे. जे काचेच्या घरात राहतात त्यांनी इतरांच्या घरावर दगड फेकायचे नसतात  हे अजित पवारांनी लक्षात ठेवले पाहिजे.

Leave a Comment