उमेदवार बाहेरचे आणि आतले

निवडणुकीच्या काळात अनेक ठिकाणी उमेदवार आयात केले जातात किंवा काही नेत्यांनी सुरक्षित मतदारसंघात हमखास निवडून आणण्यासाठी उभे केले जाते. ती त्या पक्षाची गरज असते. असा नेता पक्षाला सरकारमध्ये हवा असतो पण त्याच्या गावात तो निवडून येण्याची शक्यता कमी असते. त्या मतदारसंघातून निवडून येण्याइतके त्याचे इलेक्टोरल मेरीट नसते. मग त्याला सुरक्षित मतदारसंघात अर्थात त्याच्या पक्षाच्या बालेकिल्ल्यात उभे केले जाते. भाजपा नेते अरुण जेटली यांना असेच आता अमृतसर मतदारसंघात उभे करण्यात आले आहे. डॉ. मनमोहन सिंग हे पंतप्रधान आहेत पण ते लोकसभेवर निवडून आले नाहीत. त्यांना आसामातल्या राज्यसभेच्या जागेवरून निवडून आणावे लागले. त्यांना आसामातल्या कोणीही बाहेरचा उमेदवार म्हटले नाही. अरुण जेटली पंजाबात उभे राहताच पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी पंजाबी नसलेला उमेदवार म्हणून त्यांची संभावना केली आणि पंजाबच्या जनतेला त्यांना पराभूत करण्याचे आवाहन केले. खरे तर हा संकुचितपणा आहे कारण आपण सर्वचजण भारतीय असू तर बाहेरचा आणि आतला असा भेद राहतोच कोठे ? राजकीय पक्षांची एक चाल असते. कोणताही राजकीय पक्ष आपल्या विरोधातल्या उमेदवाराच्या कच्च्या बाजू हेरून त्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करीत असतो. 

अमृतसर हे पंजाबात आहे आणि जेटली हे पंजाबी नाहीत अशी अमरिंदरसिंग यांची तक्रार आहे. त्यांनी ती जाहीरपणे व्यक्त केली आहे. जेटली यांनी या निमित्ताने, मग सोनिया गांधी बाहेरच्या होत नाहीत का ? त्या भारतातल्या कोणत्या प्रांतातल्या आहेत असा सवाल केला. सोनिया गांधी या इटालीयन आहेत. पण त्यांचा विवाह राजीव गांधी यांच्याशी झाला तेव्हा त्या भारतीय झाल्या असे अमरिंदरसिंग यांचे म्हणणे आहे. अर्थात जेटली यांनी उत्तर घेण्यासाठी जे उदाहरण घेतले ते योग्य नसल्याने वाद भरकटला. पण या उदाहरणा बाबतही कॉंग्रेसचे नेते करतात तो विवाहाचा दावाही पुरेसा नाही कारण सोनिया गांधी यांनी विवाह होऊन गांधी घराण्याची सून होण्याचे स्वीकारले पण विवाहानंतर किती तरी वर्षे त्यांनी भारताचे नागरिकत्व स्वीकारले नव्हते. त्यांना भारतात रहायचेच नव्हते. नंतर त्यांनी नागरिकत्व स्वीकारले पण त्यांच्या भारताच्या निष्ठेविषयी साशंकताच आहे. असे असले तरी बाहेरचा उमेदवार म्हणून त्यांना आता नागरिकत्व स्वीकारल्यानंतर  म्हणता येत नाही. तशी प्रत्येक सून ही बाहेरचीच ठरेल.  जेटलींचे उत्तर चुकले याचा अर्थ अमरिंदरसिंग जे काही बोलले ते फार सयुक्तिक होते असे नाही. 

त्यांचे म्हणणे तर जेटली यांच्या उत्तरापेक्षा अप्रस्तुत आहे. जेटली हे दिल्लीचे आहेत आणि अमरिंदरसिंग यांचा त्यांच्या उमेदवारीला विरोध आहे. अमरिंदरसिंग यांचा कॉंग्रेस पक्ष अशा रितीने आपले उमेदवार त्यांच्या जन्माच्या राज्याच्या बाहेर नेऊन उभे करीत नाही का ? अमरिंदरसिंग यांना बाहेरचा उमेदवार या कल्पनेलाच विरोध असेल तर त्यांनी मनमोहनसिंग यांच्या आसामातल्या उमेदवारीला विरोध करायला हवा होता. आताही अमरिंदरसिंग यांना जेटली पंजाबी नाहीत म्हणून चालत नाहीत पण अमृतसरमधून  पंजाबातल्या कोणीही निवडणूक लढवली असती तरी त्यांना तो उमेदवार चालला असता का ? समजा अमृतसरमध्ये  जालंधरचा उमेदवार उभा केला असता तर मग अमरिंदरसिंग यांना चालला असता पण अमृतसरच्या एखाद्या नागरिकाने त्याला जालंधरचा म्हणून बाहेरचा ठरवला असता आणि विरोध केला असता तर अमरिंदरसिंग काय म्हणणार होते ?  या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, अमरिदरसिंग यांना बाहेरचा उमेदवार म्हणजे काय हे नेमके ठरवण्यात रस नाही तर त्यांना जेटली यांना विरोध करण्यासाठी एक कारण, बहाणा हवा आहे. आपल्या देशात अनेक नेत्यांनी बाहेरचे उमेदवार म्हणून निवडणुका लढवल्या आहेत. त्यांच्या पक्षाला त्यांची गरज असते आणि त्यांना कोठून ना कोठून निवडून आणणे आवश्यक असते. 

अशा वेळी बाहेरचा किंवा आतला म्हणून कोणी वाद निर्माण करीत नाहीत. आता अमरिंदरसिंग यांच्या तोंडावर कॉंग्रेसचीच काही उदाहरणे फेकली पाहिजेत. पी.व्ही. नरसिंहराव हे मुळातले आंध्रातले होते आणि त्यांनी या राज्याचे मुख्यमंत्रीपदही भूषविले होते पण त्यांना लोकसभेवर निवडून आणताना दोनदा महाराष्ट्रातल्या रामटेक मतदार संघातून उभे करण्यात आले. नंतर ते पंतप्रधान झाले आणि पोटनिवडणुकीत ओरिसातून निवडून आले.  इंदिरा गांधी यांना उत्तर प्रदेशातल्या मतदारांनी नाकारले तेव्हा त्या एकदा आंध्र प्रदेशातल्या मेदक मतदारसंघातून निवडून आल्या. त्यांचे हे खासदारपद संसदेचा हक्कभंग केल्याबद्दल रद्द झाले तेव्हा त्या पुन्हा कर्नाटकातल्या चिकमंगळूर मतदारंघातून निवडून आल्या. त्यावेळी आतला उमेदवार किंवा बाहेरचा उमेदवार असा भेद कोणी केला नाही. लोकांना बाहेरचा उमेदवार नको असेल तर ते अशा उमेदवाराला मतेच देणार नाहीत. पण ते असा भेद न करता त्यांना निवडून देतात. सारा देशच एक आहे असे मानले तर असा भेद करणे हा अपराधच ठरतो.

Leave a Comment