शरद पवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार

मुंबई – राज्यात तीन टप्प्यात होणा-या निवडणूकीचा फायदा घेऊन, दोनवेळा मतदान करा असा सल्ला पक्ष कार्यकर्त्यांना देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार अडचणीत सापडले आहेत. भाजपने त्यांच्या या विधानाविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. 

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिका-यांना पत्र देऊन रीतसर तक्रार दाखल केली आहे. पवारांवर लोकप्रतिनिधी कायद्यातंर्गत करावाई करण्याची मागणी करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसवर बंदी घालावी अशी मागणीही त्यांनी केली. सोमय्या यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली. किरीट सोमय्या प्रसिध्दी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. कुठल्याही प्रकारे प्रसिध्दीच्या झोतात रहाण्याचा सोमय्या यांचा नेहमीच प्रयत्न असतो अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी केली. 

रविवारी नवी मुंबईत माथाडी कामागाराच्या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तीन टप्प्यात होणा-या निवडणूकीचा फायदा घ्या, दोनवेळा मतदान करा असा सल्ला दिला होता. या विधानावरुन शरद पवारांवर टीका सुरु झाल्यानंतर त्यांनी आपण हे विधान गंमतीने केले अशी सारवासारव केली.