शरद पवारच “एनडीए’च्या संपर्कात-उद्धव ठाकरे

नाशिक – राष्ट्रवादी कॉंग्रेस हा भ्रमित करणारा पक्ष आहे. मतदारांना भ्रमित करण्यासाठी शिवसेनेचे खासदार आमच्या संपर्कात असल्याच्या बातम्या ते पेरतात. प्रत्यक्षात स्वतः शरद पवार राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) च्या संपर्कात आहेत. असा राजकीय दावा शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज येथे केला.  

लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ठाकरे यांनी नाशिकचा दौरा केला. यावेळी पत्रकारांशी झालेल्या वार्तालापात ते म्हणाले, “शरद पवार यांनी बोटाची शाई पुसून दोनदा मतदान करा असे जे आवाहन केले. ते त्यांनी मनातले विधान केले आहे. आजवर त्यांचा पक्ष का निवडून येत होता त्याचे रहस्य महाराष्ट्रातील जनतेला आता समजले आहे. हे गंभीर असून त्याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत. 

शिवसेनेचे खासदार व नेते संपर्कात असल्याच्या कृषिमंत्री पवार यांच्या वक्तव्याबाबत विचारल्यावर ते म्हणाले, त्यांच्याकडून सतत अशा वावड्या उठवल्या जातात. मात्र प्रत्यक्षात स्वतः शरद पवार हेच “एनडीए’च्या संपर्कात आहेत. त्यात कुठलेही रहस्य राहिलेले नाही.  गेली अनेक वर्षे शिवसेना जनतेच्या आशा-आकांक्षांनुसार काम करीत आला आहे. त्यामुळे निवडणूक लढवाव्यात अशी राज्याबाहेरील कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यानुसार शिवसेना यंदा राज्याबाहेर उमेदवार उभे करील. मात्र तसे करताना “एनडीए’ च्या उमेदवारांची अडचण होईल असे काहीही होणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ असेही श्री. ठाकरे यांनी सांगितले.

Leave a Comment