‘राष्ट्रवादी’ची मान्यता रद्द करा: ‘आप’ची मागणी

मुंबई : दोनदा मतदान करण्याचे बेकायदेशीर कृत्य करण्याचा सल्ला माथाडी मेळाव्यात देणा-या केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर कारवाई करून त्यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची मान्यता रद्द करावी; अशी मागणी आम आदमी पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. निवडणूक आयोगानेही पवार यांच्या धक्कादायक विधानाची दाखल घेऊन त्यांच्या भाषणाची सीडी मागवून घेतली आहे. 

नवी मुंबई येथे माथाडी कामगारांच्या मेळाव्यात बोलताना पवार यांनी एकदा साता-यात मतदान करा आणि बोटावरची शाई पुसून नवी मुंबईतही मतदान करा; असा धक्कादायक सल्ला रविवारी दिला होता. त्यानंतर चेंबूर येथे त्यांनी हे विधान गमतीने श्रोत्यांचे मन रिझविण्यासाठी केले असून ते गांभीर्याने घेण्याचे कारण नाही; अशी सारवासारवही पवार यांनी केलॆ. मात्र या विधानावर विरोधकांनी टीकेची झोड उठविली असून त्यामुळे पवार अडचणीत येण्याची शक्यता आहे. 

भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन पक्षाने पवारांच्या या विधानाला तीव्र आक्षेप घेतला आहे. या विधानाबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे या पक्षांच्या नेत्यांनी सांगितले. आप देखील याबाबत शिष्टमंडळ घेऊन निवडणूक आयोगाच्या अधिका-यांना भेटणार असल्याचे पक्षाच्या सचिव प्रीती मेनन यांनी सांगितले. भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी पवार यांच्या या विधानाबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून पोलिसांकडेही तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनीही ट्विटर द्वारे राष्ट्रवादी कॉंग्रेसवर ताशेरे ओढले आहेत.  या  राज्यात बोगस धरणे आणि आता बोगस मतदान करणारी एनसीपी ही नेशनल करप्शन पार्टी आहे; अशा शब्दात त्यांनी राष्ट्रवादीची खिल्ली उडविली आहे.