जयललितांकडे सर्वांचे लक्ष

आगामी निवडणुकांनंतर पंतप्रधान होण्यास उत्सुक असलेल्या तीन स्त्रियांवर जनेतेचे लक्ष होते. त्यातल्या ममता बॅनर्जी तूर्तास तरी मागे पडल्या आहेत. मायावती अजून तरी म्हणाव्या तशा आत्मविश्‍वासाने बोलत नाहीत. मुळात त्यांचा प्रभाव उत्तर प्रदेशाच्या बाहेर पडेनासा झाला आहे आणि यावेळी तिथे तरी तो पडेल की नाही या विषयी त्या स्वतःच साशंक आहेत. त्यामुळे तीन स्त्रियांपैकी जयललितांच्या नावाचा गवगवा तूर्तास तरी जोरात आहे. अर्थात त्या पंतप्रधान कशा काय होऊ शकतील, ते शक्य आहे का अशा कितीही चर्चा झाल्या तरी स्वतः जयललिता मात्र ते स्वप्न बाळगून आहेत. तामिळनाडूतल्या लोकसभेच्या ३९ जागा आणि पॉंडेचेरीतली एक जागा अशा ४० जागांपैकी  बहुसंख्य जागा आपण जिंकू असा विश्‍वास त्यांना वाटत आहे. गेला बाजार २५ ते ३० जागा तर त्यांना मिळणारच. हे कोणीही मान्य करेल. पाचसुध्दा जागा जिंकण्याची क्षमता नसणारे शरद पवार जर पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहू शकत असतील तर ३० जागा जिंकणार्‍या जयललितांनी ते स्वप्न का पाहू नये? या लोकशाहीत स्वप्न पहायला बंदी आहे की काय? 

जयललितांचा प्रचारसुध्दा मोठ्या जोमाने सुरू आहे. त्यांचा प्रखर प्रतिस्पर्धी असलेला डीएमके पक्ष विकलांग झाला आहे. त्यामुळे जयललितांना मोठ्या अपेक्षा आहेत. कॉंग्रेस पक्ष हा तामिळनाडूतली तिसरी शक्ती म्हणून ओळखला जातो परंतु यावेळी कॉंग्रेसबरोबर कोणी युती करायला तयार नाही. त्यामुळे यावेळी या पक्षाचा सफाया होणाार हे निःसंशय आहे. अडीच वर्षापूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जयललिता यांच्या अण्णाद्रमुक पक्षाने विजय मिळवला आणि तेव्हा पासून लोकसभा निवडणुकीची पायाभरणी अशी काही भक्कम करून टाकली आहे. की लोकसभा निवडणुकीतसुध्दा द्रमुकला तसाच पराभव पत्करावा लागावा. 

जयललिता यांची राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही.  त्यांनी देशाचा विचार करून जाहीरनामा काढला आहे. पीस, प्रॉस्पेरिटी आणि प्रोग्रेस म्हणजे शांतता, संपन्नता आणि विकास या तीन मुद्यांना त्यांनी प्राधान्य दिले आहे. त्या ज्या ठिकाणी सभेला जातात त्या ठिकाणचे त्यांचे व्यासपीठ संसदेच्या आकाराचे केलेले असते. आपण सत्तेवर आल्यापासून जनतेला काय काय स्वस्त दिले आणि जनतेसाठी काय काय गोष्टी केल्या. याचा त्या आवर्जुन उल्लेख करतात.

त्यांना तामिळनाडूमध्ये अम्मा म्हटले जाते. कर्नाटकात अम्मा म्हणजे आई. पण तामिळ भाषेत मात्र अम्माचा अर्थ बहीण असा होतो. तेव्हा या अम्माला बघण्यासाठी आणि त्यांचे भाषण ऐकण्यासाठी लोक अलोट गर्दी करतात. जयललितांनी एक रुपयात इडली, मोफत तांदूळ, गरीब वधूंना मोफत मंगळसूत्र, स्वस्त मिनरल वॉटर, स्वस्त कपडा अशा अनेक योजना राबवून लोकांना महागाईपासून दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या जोरावर आपले स्वप्न पूर्ण होणार असा विश्‍वास त्यांना वाटतो. त्यांच्या प्रतिस्पर्धी द्रमुक पक्षाने १९९९ पासून केंद्रातल्या सरकारला पाठिंबा दिला आहे. म्हणजे हा पक्ष १५ वर्षे केंद्रातल्या सत्तेत आहे. परंतु तिथल्या वजनाचा फायदा घेऊन द्रमुक पक्षाने तामिळनाडूसाठी काहीच कसे केलेले नाही याची आठवण त्या लोकांना करून देतात.

Leave a Comment