मुंबई- आगामी काळात होत असलेल्याी लोकसभा निवडणूकीत आघाडीर सरकारमधील पाच मंत्र्यांना निवडून येण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे. राष्ट्रवादी काग्रेसने छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि सुरेश धस या तीन मंत्र्यांना तर काँग्रेसने संजय देवताळे आणि राजेंद्र गावित या दोन मंत्र्यांना रिंगणात उतरविले आहे. आगामी काळात होत असलेल्याे लोकसभा निवडणूकीत मंत्रिपद भूषविलेल्या या पाचही जणांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
जळगाव जिल्हयातील काँग्रेसचे मंत्री संजय देवतळे यांना विरोधकांबरोबरच स्वपक्षीयांशीही सामना करावा लागेल. कारण माजी खासदार नरेश पुंगलिया हे देवतळे यांना विरोध करण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसचे दुसरे मंत्री व ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर स्वतंत्र जिल्हा करावा म्हणून गेली दोन वर्षे सातत्याने पाठपुरावा करणा-या गावित यांना हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीबरोबरच भाजपशी सामना करावा लागणार आहे.
राष्ट्रवादीचे मंत्री सुनील तटकरे यांना शिवसेनेचे अनंत गिते यांच्याशी दोन हात करावे लागणार आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये रायगडमध्ये स्वत:ची ताकद निर्माण करणा-या तटकरे यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नाही. गिते यांच्यासाठी कुणबी समाजातील मतदारांची असलेली मोठी संख्या हा मुद्दा फायदेशीर ठरणारा आहे. इच्छा नसतानाही केवळ पक्षाच्या आदेशामुळे नाशिकमधून छगन भुजबळ यांना लोकसभेची निवडणूक लढवावी लागत आहे. गेल्या वेळी मनसे आणि शिवसेनेतील मतविभाजनामुळे भुजबळांचे पुतणे समीर यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला होता. गेल्या वेळी दुस-या क्रमांकावर असलेले मनसेचे गोडसे हे आता शिवसेनेचे उमेदवार आहेत.
भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात लढण्याच्या उद्देशानेच राष्ट्रवादीने गेल्या जून महिन्यात धस यांच्याकडे राज्यमंत्रीपद भूषविले होते. पूर्वी भाजपमध्ये असलेले धस हे वादग्रस्त म्हणून ओळखले जातात. मुंडे यांच्या विरोधात मराठा समाजाच्या मतांचे ध्रुवीकरण करण्याच्या उद्देशानेच धस यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. मुंडे यांचा जिल्ह्यावर असलेला प्रभाव लक्षात घेता धस यांचा टिकाव लागणे कठीणच मानले जाते.