मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मावळ आणि रायगड लोकसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे. बुधवारी शेकापचे नेते जयंत पाटील यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर मनसेने या दोन लोकसभा मतदारसंघांसाठी शेकापला पाठिंबा जाहीर केला.
शेकाप मावळ आणि रायगडची जागा स्वबळावर लढवत आहे. मनसेच्या या निर्णयामुळे शिवसेना उमेदवारांच्या अडचणी वाढणार आहेत. मागच्या निवडणूकीत शेकापच्या मतांमुळे शिवसेनेचे उमेदवार सहज निवडून आले होते. मात्र यावेळी शेकापची मते शिवसेनेला मिळणार नाहीत त्यामुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. यंदाच्या निवडणूकीत शेकापने शिवसेनेबरोबरची सहकार्याची युती तोडून मावळ आणि रायगडमध्ये स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. शेकापकडून रायगडमधुन रमेश कदम आणि मावळमधून लक्ष्मण जगताप रिंगणात आहेत. एक राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी आमदार तर, एक विद्यमान आमदार आहे.
राष्ट्रवादीकडून रायगडमधून सुनील तटकरे आणि मावळमधुन राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या दोन लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचा विजयाचा सिलसिला रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच ही राजकीय खेळी खेळल्याची चर्चा आहे. शिवसेनेने रायगडमधून अनंत गीते तर, मावळमधुन श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली आहे.